पालखी सोहळ्याबाबत दोन दिवसांत निर्णय 

संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे नियोजन आणि त्याचे स्वरूप कसे असेल, याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे
 Decision in two days regarding Palkhi ceremony
Decision in two days regarding Palkhi ceremony

पुणे : संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे नियोजन आणि त्याचे स्वरूप कसे असेल, याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवारी दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आयोजित बैठकीत पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे पाटील, योगेश देसाई, अभय टिळक, विशाल मोरे, संतोष मोरे, माणिक मोरे, संजय मोरे आदींसह दोन्ही देवस्थानचे विश्‍वस्त या वेळी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी राम म्हणाले, वारकरी संप्रदायाची परंपरा असलेल्या ऐतिहासिक श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. या पालखी सोहळ्यात दरवर्षी लाखोंच्या संख्येने राज्यभरातील वारकरी सहभागी होत असतात. कोरोनाच्या संसर्गाचे संभाव्य परिणाम लक्षात घेता आळंदी ते पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरूप कसे असावे, याबाबत आळंदी व देहू या दोन्ही संस्थांन प्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आळंदी ते पंढरपूर श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांची पायी वारी व पालखी सोहळ्याच्या स्वरूपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. 

कमी संख्येत पालखी सोहळ्याची परंपरा जपू 
सोशल डिस्टन्सिंगबाबत नियमावली, टाळेबंदीची परिस्थिती, संभाव्य स्थिती आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण पाहता पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यात येईल. सरकारच्या सूचनांचे काटेकोर पालन करून आम्ही कमी संख्येत पालखी सोहळयाची परंपरा कायम ठेवणार आहोत, असे श्री ज्ञानेश्वर महाराज देव संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे-पाटील यांनी सांगितले. 
 

आषाढी वारीची परंपरा अबाधित राहावी, यासाठी तसेच या सोहळ्यासाठी गरजेच्या आवश्‍यक सुविधा सरकारकडून अपेक्षित आहेत. आम्ही समाजाच्या आरोग्याची काळजी घेत नियमावलीचे पालन करून पालखी सोहळ्याची परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न करू. 
-मधुकर महाराज मोरे, 
प्रमुख विश्वस्त, देहू देवस्थान 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com