दहीहंडी उत्सवाबाबत प्रश्‍नचिन्ह; राज्य सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा

दहिहंडीउत्सवात सोशल डिस्टन्सिंगचे पालन कसे करणार, हा मोठा प्रश्‍न पथकांसमोर आहे. तसेच, राज्य सरकारच्या निर्णयाकडेही मंडळ, गोविंदा पथकांचे लक्ष आहे. त्यामुळे सध्या गोविंदा पथक आणि दहीहंडी समन्वय समिती 'वेट ऍण्ड वॉच' भूमिकेमध्ये आहेत
Dahi Handi Mandals Awaiting Government Decision
Dahi Handi Mandals Awaiting Government Decision

मुंबई  : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने आणखी पुढील काही महिने कोरोनाच्या सावटातच काढावे लागणार, अशी दाट शक्‍यता आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये होणाऱ्या दहीहंडी उत्सवात लोणी लुटायला मिळेल का, असा सवाल गोविंदा पथकांना पडला आहे.

या उत्सवात सोशल डिस्टन्सिंगचे पालन कसे करणार, हा मोठा प्रश्‍न पथकांसमोर आहे. तसेच, राज्य सरकारच्या निर्णयाकडेही मंडळ, गोविंदा पथकांचे लक्ष आहे. त्यामुळे सध्या गोविंदा पथक आणि दहीहंडी समन्वय समिती 'वेट ऍण्ड वॉच' भूमिकेमध्ये आहेत.

मुंबई दहीहंडी उत्सवाचे वेगळे वलय आहे; परंतु गेले तीन वर्ष या उत्सवामध्ये अनेक विघ्न आली. मंडळांना सलग तीन वर्षे न्यायालयाची पायरी चढावी लागली; तरीही दिलेल्या आदेशाप्रमाणे गोविंदांनी उत्साहात उत्सव साजरा केला; मात्र यंदाचे कोरोना संकट हे अधिक आव्हानात्मक आहे. त्यामध्ये शारीरिक अंतर राखायचे कसे, हा मोठा प्रश्‍न आहे. दहीहंडी फोडताना थरावर थर रचले जातात. एका संघात किमान १०० आणि जास्तीत जास्त ३०० ते ३५० गोविंदांचा समावेश असतो. नेहमी दहीहंडी उत्सवासाठी मे अखेरपासून मोठ्या पथकांचा सराव सुरू होतो; मात्र यंदा सोशल डिस्टन्सिंगमुळे सरावाला अजून सुरुवात झाली नाही. परिस्थिती पाहता पुढे सराव कसा करायचा, हाही प्रश्‍न गोविंदा पथकांसमोर आहे.

दहीहंडी उत्सवाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशामुळे गोविंदा पथकांच्या आर्थिक खर्चात वाढ झाली. तसेच आयोजकांचाही खर्च वाढला. उत्सवासाठी स्पॉट विमा, गोविंदांचा विमा असणे आवश्‍यक आहे. तसेच गोविंदांच्या सुरक्षेसाठी आयोजकांनी सेफ्टी उपकरण देणे बंधनकारक आहे. या नियमांमुळे अनेक आयोजकांनी माघार घेतली. त्यामुळे बक्षीस रक्कम कमी झाली; मात्र स्पर्धा कायम राहिली. मागील वर्षापासून आर्थिक मंदीमुळे कॉर्पोरेट कंपन्यांनीही हात आखडता घेतला. 

प्रायोजक मिळणे कठीण

टी-शर्ट, वाहतूक खर्च भागवणे यामध्ये अडचणी निर्माण झाल्या. आता तर लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था विस्कळित झाली. त्यामुळे या वर्षी उत्सवासाठी आवश्‍यक रसद मिळण्याची शक्‍यता कमी आहे. गोविंदांना प्रायोजक मिळणेही कठीण होणार आहे. बहुतांशी आयोजक आणि प्रायोजक हे तेथील स्थानिक नेते असतात; परंतु कोरोनामुळे सर्वच नेते या लढ्यात आपापल्या परिने मदत करत आहेत. या परिस्थितीत नेते मंडळी उत्सवासाठी कितपत पुढाकार घेतील याबद्दल शंका आहे.

लवकरच बैठक

दहीहंडी समन्वय समितीने दहीहंडी उत्सवाबाबत अजून कोणतीही भूमिका घेतलेली नाही. समिती सरकारच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. जून महिन्यात या सर्व परिस्थितीचा विचार करून दहीहंडी उत्सवाबबात पथकांची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे समितीकडून सांगण्यात आले.

उत्सव साजरा करण्यावर ठाम

गेल्या आठवड्यापासून ठाणे, मुंबईच्या गोविंदा पथकांची ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा सुरू आहे. गोविंदा पथक उत्सव करण्यावर ठाम आहेत. त्याचे स्वरूप कसे असेल याबाबत अजून चित्र स्पष्ट होत नाही. त्यावरच विचार सुरू आहे. काही आयोजक उत्सव साजरा करायला तयार आहेत; परंतु राज्य सरकार उत्सवाबाबत काय भूमिका घेते, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. आम्ही राज्य सरकारच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहोत. दहीहंडी उत्सवात शारीरिक अंतर ठेवणे मोठे आव्हान आहे. त्याबाबत विचार सुरू आहे, अशी माहिती यंग उमरखाडी गोविंदा पथकाचे कमलेश भोईर यांनी माहिती दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com