फेब्रुवारीत कोव्हिडची दुसरी लाट? प्रशासनाकडून सूचना जारी - Corona Second Wave may come in February | Politics Marathi News - Sarkarnama

फेब्रुवारीत कोव्हिडची दुसरी लाट? प्रशासनाकडून सूचना जारी

सरकारनामा ब्युरो
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

राज्यात कोव्हिडची दुसरी लाट जानेवारी-फेब्रुवारीत येण्याची शक्‍यता राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने वर्तवली आहे. ऑक्‍टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोव्हिड रुग्णांची संख्या कमी आहे; मात्र युरोपमधील अनेक देशांमध्ये कोव्हिडची दुसरी लाट आलेली दिसून येत आहे. यावरून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे

मुंबई  : राज्यात कोव्हिडची दुसरी लाट जानेवारी-फेब्रुवारीत येण्याची शक्‍यता राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने वर्तवली आहे. ऑक्‍टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोव्हिड रुग्णांची संख्या कमी आहे; मात्र युरोपमधील अनेक देशांमध्ये कोव्हिडची दुसरी लाट आलेली दिसून येत आहे. यावरून हा अंदाज वर्तवण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून काही महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

कोरोना रुग्णसंख्येच्या उतरणीच्या काळातही प्रयोगशाळा सर्वेक्षण सक्षमपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे राज्य आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दररोज १० लाख लोकसंख्येमागे किमान १४० तपासण्या करण्यात याव्यात, यासाठी प्रत्येक जिल्हा आणि पालिका क्षेत्रात प्रयोगशाळा चाचणी केंद्रे कार्यान्वित करून त्यांची माहिती विविध माध्यमांतून जनतेला देण्यात यावी, असे निर्देशही दिले आहेत. दुसऱ्या लाटेसंदर्भातील सतर्कतेचा इशारा वेळेवर मिळावा, यासाठी शहरांसह ग्रामीण भागात फ्यू-क्‍लिनिक सुरू करून फ्लूसदृश रुग्णांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच फ्ल्यूसारखे आजार असणारे रुग्ण आढळणाऱ्या भागात प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात येणार असून गृहभेटीद्वारे सर्वेक्षण आणि कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग अधिक वेगाने करण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले.

अशी घ्या काळजी
- गर्दी, समूहात असताना मास्क वापर अनिवार्य.
- हातांची नियमित स्वच्छता
- दोन व्यक्तींमध्ये शारीरिक अंतर राखणे
- सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, थुंकणे टाळणे,
- अनावश्‍यक प्रवास टाळणे
- आवश्‍यक तेव्हा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

छोटे व्यावसायिक, घरगुती सेवा पुरविणारे कामगार, वाहतूक व्यवसायातील लोक-मालवाहतूक करणारे ट्रकचालक, टेम्पोचालक, रिक्षाचालक, सुरक्षारक्षक, शासकीय-निमशासकीय कर्मचारी तसेच पोलिस, होमगार्ड यांसारख्या सामाजिक संपर्क असणाऱ्या व्यक्तीचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. गरजेनुसार तातडीच्या वेळी कोविडसाठी अधिकच्या खाटा तत्काळ उपलब्ध करण्यासह कोव्हिडसाठी लागणारी औषधे, साधनसामुग्रीचा अतिरिक्त साठा करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच कृती दलाला परिस्थितीचा आढावा घेऊन आपले निरीक्षण नोंदवण्यास सांगण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिक, दीर्घकालीन व्यक्ती तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब व इतर आजारी व्यक्तींसाठी को-मॉर्बिडिटी क्‍लिनिक सुरू करण्यात येणार आहे.
- डॉ. अर्चना पाटील, संचालक, राज्य आरोग्य विभाग.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख