Corona enters Aamir Khan's house | Sarkarnama

आमिर खानच्या घरात कोरोनाचा प्रवेश 

सरकारनामा ब्यूरो 
बुधवार, 1 जुलै 2020

अभिनेता आमिर खानच्या सहकाऱ्यांमधील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आमिरने फेसबुकवर पोस्ट लिहित याची माहिती दिली आहे. या कर्मचाऱ्यांना ताबडतोब क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

मुंबई : अभिनेता आमिर खानच्या सहकाऱ्यांमधील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आमिरने फेसबुकवर पोस्ट लिहित याची माहिती दिली आहे. या कर्मचाऱ्यांना ताबडतोब क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

त्याचसोबत इतरही कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी होऊन बाकी सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आमिर खानच्या आईची कोरोना चाचणी बाकी असून त्यांना चाचणीसाठी घेऊन जाणार असल्याचे त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे. 

आईचा रिपोर्ट निगेटिव्ह यावा, यासाठी प्रार्थना करण्याची विनंती आमिर खानने चाहत्यांना केली आहे. 

आमिर खान पोस्टमध्ये म्हणतो की, माझ्या काही कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना ताबडतोब क्वारंटाइन करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेकडून योग्य ती उपचाराची काळजी घेतली जात आहे. संपूर्ण सोसायटी सॅनिटाइज केल्याबद्दल आणि कोरोनाबाधितांची योग्य ती काळजी घेतल्याबद्दल मी मुंबई महानगरपालिकेचे मनापासून आभार मानतो.
 
"उरलेल्या कर्मचाऱ्यांची आणि माझीही चाचणी करण्यात आली असून सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मी पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेचे आभार मानतो. कोकिलाबेन अंबानी रुग्णालयाचे आणि तिथल्या डॉक्‍टर्स, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांचेही मी आभार मानतो. कोरोना चाचणी करण्यात त्यांनी खूप मदत केली,' असे आमिरने पोस्टमध्ये म्हटले आहे. 

निर्माते बोनी कपूर आणि करण जोहर यांच्या घरातील नोकरांना कोरोनाची बाधा झाली होती, त्यांनी कोरोनावर मात केली आहे. 

राज्यात कोरोनाचे 76 हजार रुग्ण 

मुंबई : राज्यात मंगळवारी (ता. 30 जून) कोरोनाच्या 4878 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात 75 हजार 979 रुग्णांवर (ऍक्‍टीव्ह) उपचार सुरू आहेत. 

मंगळवारी 1951रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या 90 हजार 911 झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 52.2 टक्के एवढे कायम आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

मंगळवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या 9 लाख 66 हजार 723 नमुन्यांपैकी 1 लाख 74 हजार 761 नमुने पॉझिटिव्ह (18.7 टक्के) आले आहेत. 

राज्यात 5 लाख 78 हजार 33 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 38 हजार 866 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 
राज्यात आज 245 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी 95 मृत्यू मागील 48 तासांमधील तर उर्वरित 150 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्यूदर 4.49 टक्के एवढा आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख