कोकणात काँग्रेस पक्ष थंडावला; कोकणासाठी कार्यकारी अध्यक्षच नाही - Congress workers waiting for good leadeship in Konkan region | Politics Marathi News - Sarkarnama

कोकणात काँग्रेस पक्ष थंडावला; कोकणासाठी कार्यकारी अध्यक्षच नाही

सरकारनामा ब्युरो
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची नियुक्ती करताना सहा कार्याध्यक्ष नेमण्यात आले. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रत्येकी एक तर मुंबईतील दोघांची नियुक्ती करण्यात आली. कोकणाला कार्याध्यक्षांमध्ये प्रतिनिधित्वच मिळालेले नाही. हुसेन दलवाई वगळता कॉंग्रेसकडे तळकोकणसाठी नेतृत्वच नसल्याचे दिसते.

चिपळूण : नाना पटोले यांची कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करताना सहा कार्याध्यक्ष नेमण्यात आले. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रत्येकी एक तर मुंबईतील दोघांची नियुक्ती करण्यात आली. कोकणाला कार्याध्यक्षांमध्ये प्रतिनिधित्वच मिळालेले नाही. हुसेन दलवाई वगळता कॉंग्रेसकडे तळकोकणसाठी नेतृत्वच नसल्याचे दिसते.

कॉंग्रेसने नुकतेच प्रदेश कार्यकारणीमध्ये बदल केला. बाळासाहेब थोरात यांच्याकडे असलेले प्रदेशाध्यक्षपद नाना पटोले यांना देण्यात आले. त्यांच्या जोडीला सहा कार्यकारी अध्यक्ष आणि दहा उपाध्यक्ष नेमण्यात आले आहेत. माजी खासदार हुसैन दलवाई यांची पुन्हा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून वर्णी लागली. थोरात यांच्या कार्यकारिणीमध्येही ते उपाध्यक्ष होते.

त्यांच्या जोडीला रायगडचे माणिकराव जगताप यांनाही उपाध्यक्षपद देण्यात आले. कार्यकारिणीतील इतर पदे अजून जाहीर व्हायची आहेत. मात्र, कोकण वगळता राज्यातील इतर प्रदेशासाठी कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात आले. मग कोकणसाठी ही नियुक्ती का नाही, असा प्रश्‍न कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. 

नारायण राणे कॉंग्रेसमध्ये असताना पदांसाठी रस्सीखेच व्हायची. राणे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना पद मिळू नये, यासाठी लॉबिंग व्हायचे. तरीही राणेंना कॉंग्रेसमध्ये असताना विधानसभा निवडणुकी दरम्यान प्रचार समितीचे प्रमुख आणि माजी खासदार नीलेश राणेंना प्रदेश सरचिटणीसपद देण्यात आले होते.

राणे समर्थक सुभाष बने, गणपत कदम विधान परिषद सदस्यपदासाठी इच्छूक असताना हुस्नबानू खलिफे यांना विधान परिषद सदस्यपद देण्यात आले होते. राणेंनी पक्ष सोडल्यानंतर तत्काळ दलवाईंसह कॉंग्रेस नेते कोकणच्या दौऱ्यावर आले. बैठकांचे सत्र सुरू झाले. नव्या जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली. त्यानंतर कोकणातील कॉंग्रेस थंडावली. 

कॉंग्रेस हायकमांडने कोकणसाठी कार्याध्यक्ष का नेमला नाही, याची मला कल्पना नाही. या संदर्भात मी वरिष्ठाकडे चर्चा करणार आहे. आगामी काळात मी आणि माणिकराव जगताप कोकणात पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार आहोत -हुसैन दलवाई, प्रदेश उपाध्यक्ष

कोकणात कॉंग्रेसकडे कार्यकर्ते खूप आहेत. एखाद्या कार्यकर्त्याला जबाबदारी दिल्यानंतर तो त्या जबाबदीनुसार काम करतो आणि प्रकाशझोतामध्ये येतो. त्यासाठी प्रथम जबाबदारी देणे गरजेचे आहे. प्रदेश पातळीवर कार्याध्यक्ष का नेमला गेला नाही, याची माहिती पक्षाकडून मी घेणार आहे -विजय भोसले, जिल्हाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा कॉंग्रेस

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख