बजेट आहे की निवडणुकीचा जाहीरनामा? बाळासाहेब थोरातांचा सवाल - Congress Leader Balasaheb Thorat Criticizes Central Budget | Politics Marathi News - Sarkarnama

बजेट आहे की निवडणुकीचा जाहीरनामा? बाळासाहेब थोरातांचा सवाल

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा अर्थसंकल्प आहे की निवडणुकीचा जाहीरनामा असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा अर्थसंकल्प आहे की निवडणुकीचा जाहीरनामा असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काहीवेळा पूर्वी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना प्राप्तीकरात कुठलाही दिलासा देण्यात आलेला नाही. दुसरीकडे पेट्रोल व डिझेलवर कृषी अधिभार लावला आहे. याबाबत बाळासाहेब थोरातांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारी मालकीच्या कंपन्यांची निर्गुंतवणूक प्रक्रिया जलद करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. यावरुनही थोरात यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

संस्था विकून आत्मनर्भय होणार का, असा सवाल उपस्थित करत, "देश बिकने नहीं देंगे अस पंतप्रधान बोलत होते. पण ते खोटं बोलत होते. हे बजेट देशासाठी आहे की येणाऱ्या निवडणुकीसाठी जाहिरनामा आहे,'' असे थोरात म्हणाले. महाराष्ट्र सर्वात जास्त कर केंद्राला देत असतो. मात्र महाराष्ट्र कडे बघण्याची दृष्टी चांगली नाही, असाही आरोप थोरात यांनी केला. अर्थव्यवस्थेत काही दिलासा या अर्थसंकल्पासून मिळालेला नाही, मात्र भांडवलदारांसाठी काही दिलासादायक आहे काय हे पहावे लागेल, असेही थोरात म्हणाले.

"ज्या संस्था सक्षम आहे त्या संपवण्याचं काम सुरू आहे. काँग्रेसने गेल्या अनेक वर्षात या संस्था सर्वसामान्य लोकांसाठी भक्कम केल्या होत्या त्या संपवण्याचा प्रयन्त सुरू आहे. पेट्रोल डिझेल च्या कच्या मालाच्या किमती कमी होत असताना आपल्याकडे मात्र दर वाढताना पाहायला मिळतात. पैसे कसे उभे करायचे आणि कुठे खर्च करायचे हे समजत केंद्राला समजत नाही. मीच काय सर्व देशही नाराज आहे," असा दावा थोरात यांनी केला.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख