...तर जीवनावश्यक सेवाही बंद होणार; मुख्यमंत्र्यांनी दिले कडक कारवाईचे आदेश...

सर्व यंत्रणांना नियमांची अंमलबजावणी कडक करण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
CM Uddhav Thakarey gives strict direction to administration
CM Uddhav Thakarey gives strict direction to administration

मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात आज रात्री आठ वाजल्यापासून संचारंबदी लागू झाली आहे. पुढील 15 दिवस राज्यात अनेक कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. यापार्श्वभूमीवर आताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश आज यंत्रणांना दिले. तसेच जीवनावश्यक आणि आवश्यक सेवांमुळे नियम मोजले जात असतील तर स्थानिक प्रशासनाने त्या सुविधाही बंद कराव्यात, अशा स्पष्ट सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

राज्यातील संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॅान्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्व यंत्रणांना नियमांची अंमलबजावणी कडक करण्याच्या सुचना दिल्या. जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत. मात्र याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत, किंवा गर्दी होत आहे असे दृश्य दिसता कामा नये. अन्यथा त्या सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद कराव्यात, असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले. 

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, तसेच राज्याच्या व जिल्ह्यांच्या टास्क फोर्सचे डॉक्टर्स  हेही या बैठकीला उपस्थित होते.

राज्य शासनाने दुर्बल घटकातील व गरीब लोकांसाठी जाहीर केलेले आर्थिक सहाय्य व्यवस्थित पोहचवावे. तसेच कोणत्याही तक्रारी येणार नाही यादृष्टीने चांगले नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. ऑक्सिजनचा योग्य वापर तसेच रेमडेसिविरबाबत काळजीपूर्वक पाऊले उचलावी लागतील. जम्बो सुविधा या येणारा पावसाळा, वादळे लक्षात घेऊन सुरक्षित आहेत किंवा नाही ते तपासून घ्यावे. सर्व रुग्णालयांचे अग्नि सुरक्षा ऑडीट पूर्ण करून घ्यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

अतिरेक करू नका - कुंटे यांची सूचना

बैठकीच्या सुरवातीला मुख्य सचिव  सीताराम कुंटे यांनीही काही सुचना दिल्या. आपण कडक निर्बंध लावले आहेत त्याची चांगली अंमलबजावणी होईल, याकडे लक्ष द्यावे. पण आपला मुख्य उद्देश हा कोविड्ची संसर्ग साखळी तोडणे हा आहे, हे लक्षात ठेवावे. कुठलाही अतिरेक किंवा विसंगत कृती करू नये, कोणतीही  शंका असल्यास मंत्रालयाला तातडीने मार्गदर्शन मागावे, असे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com