राजभवनाला बगल देवून मुख्यमंत्र्यांचे  महालक्ष्मीवरून उड्डाण  - CM Uddhav Thackeray Avoided Rajbhavan Helipad | Politics Marathi News - Sarkarnama

राजभवनाला बगल देवून मुख्यमंत्र्यांचे  महालक्ष्मीवरून उड्डाण 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना विमानउड्डाणाची परवानगी नाकारल्यानंतर पालघरकडे निघालेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कार्यालयाने राजभवनाच्या धावपट्टीचा वापर करणेच टाळले. सकाळी आकाशात झेपावताना आज महालक्ष्मी रेसकोर्सवरील धावपट्टीचा वापर केला गेला.

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना विमानउड्डाणाची परवानगी नाकारल्यानंतर पालघरकडे निघालेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कार्यालयाने राजभवनाच्या धावपट्टीचा वापर करणेच टाळले. सकाळी आकाशात झेपावताना आज महालक्ष्मी रेसकोर्सवरील धावपट्टीचा वापर केला गेला.

सामान्यत:दक्षिण मुंबईतून उड्डाण घेताना शासकीय विमाने राजभवनावरील हेलीपॅडचा वापर करतात.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज  पालघरच्या आत आत पसरलेल्या गावांची पहाणी करणार आहेत. त्यासाठी ते राजभवनातून उड्डाण करणार हे गृहित धरले असताना प्रत्यक्षात मुख्यमंत्री कार्यालयाने कार्यक्रमात महालक्ष्मी हेलिपॅडचे स्थान निश्चित केले. सकाळी ९ च्या सुमारास मुख्यमंत्री आकाशात झेपावलेही.काल घडलेल्या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर राजभवनाची परवानगी मागणे मुख्यमंत्री कार्यालयाने हेतुत: टाळले, की राज्यपालांशी शक्यतो संबंध येवूच द्यायचा नाही, हे त्यामागचे धोरण आहे काय याबद्दल उत्सुकता आहे.

मसुरी येथे आयएएस प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमासाठी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी निघाले होते. नियोजनानुसार त्यांनी आधीपासूनच विमानाची नोंदणी केली होती, असे सांगितले जात आहे. त्यानुसार राज्यपाल विमानात जाऊन बसलेही. जवळपास २० मिनिटे बसल्यानंतर त्यांच्या विमानाला सरकारची परवानगी नसल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना खाजगी विमानाने जावे लागले. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

त्यावरुन शिवसेनेने भाजपवर काल निशाणा साधला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना विमान नाकारण्याच्या प्रकरणाशी भाजपचा काय संबंध आहे. भाजपला एवढंच वाईट होते, तर भाजपने त्यांचं विमान राज्यपालांना द्यायला पाहिजे होते. भाजपकडे खूप कमर्शियल विमानं आहेत. कोश्‍यारीसाहेब हे भाजपचेच नेते आहेत. अलीकडे राजभवनामध्ये राज्यापेक्षा भाजपचीच पक्षकार्ये जास्त चालतात, अशी लोकांची भावना आहे. राज्यपालांचा अपमान व्हावा, अशा प्रकारचं कोणतंही काम राज्य सरकार अणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार नाहीत आणि त्यांनी ते केलं नाही, अशा शब्दांत कोश्‍यारी यांना डेहराडूनला जाण्यासाठी राज्य सरकारने विमान नाकारल्याच्या प्रकरणावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले होते. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख