जे विकेल तेच पिकेल - शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा - CM Uddhav Thackeray Announces New Scheme For Farmers | Politics Marathi News - Sarkarnama

जे विकेल तेच पिकेल - शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा

सरकारनामा ब्युरो
रविवार, 13 सप्टेंबर 2020

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकरी वर्क फ्राॅम होम नाही करु शकत. नवी योजना आणली आहे. शेतकरी आयुष्यच गहाण टाकतो आणि अन्नधान्य पिकवतो. त्यामुळे शेतऱ्यांवरचा कर्जाचा बोजा वाढताच राहतो. आता यापुढे शेतकरी कर्जबाजारी राहता कामा नये, अशा उपाययोजना आपण करणार आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले

मुंबई : शेतकऱ्यांसाठी आपण आता जे विकेल ते पिकेल अशी योजना सुरु करतो आहोत. महाराष्ट्राची ओळख दर्जेदार पीक देणारे राज्य अशी होईल हे पाहणार आहोत. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. 

ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी सोशल मिडियावरुन संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कोरोना उपाययोजना, मराठा आरक्षण यासह शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, "सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकरी वर्क फ्राॅम होम नाही करु शकत. नवी योजना आणली आहे. शेतकरी आयुष्यच गहाण टाकतो आणि अन्नधान्य पिकवतो. त्यामुळे शेतऱ्यांवरचा कर्जाचा बोजा वाढताच राहतो. आता यापुढे शेतकरी कर्जबाजारी राहता कामा नये, अशा उपाययोजना आपण करणार आहोत. जे पिकवणार ते विकले गेलेच पाहिजे, अशी साखळी निर्माण करतो आहोत,"

तु पुढे म्हणाले, "आतापर्यंत जे पिकेल ते विकेल, अशी स्थिती होती. पण आता 'जे विकेल ते पिकेल' अशी योजना आपण सुरु करतो आहोत. आपले कृषीखाते जगभरातली देशभरातली बाजारपेठ पाहिल. कोणत्या ठिकाणी काय विकले जाते, त्याचा दर्जा काय असतो, प्रत काय असते याचा अभ्यास करेल. त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना बियाणे पुरवले जाईल. यापुढे आता शेतकऱ्यांनी अंधारात उडी मारू नये. जे निश्चित विकले जाईल, तेच पिकवावे," विभागवार शीतगृहे निर्माण करतो आहोत. मालवाहतुकीची साखळी उभारतो आहोत. शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणार आहोत. शेतकऱ्यांचे गट करुन त्यांना मार्गदर्शनही करणार आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

महाविकास आघाडीबाबत बोलताना ठाकरे म्हणाले, "महाविकास आघाडीने आपले वचन पाळले आहे. २९.५ लाख शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्त केले. पावणेदोन कोटी शिवभोजन थाळ्या पुरवून लोकांची भूक भागवली.  साडेबारा लाख कुपोषित बालकांना दूध भूकटी पुरवली सव्वा दोन कोटी गरोदर मातांना दूध भुकटी पुरवठा करतो आहोत. कोरोनाच्या काळात केवळ लाॅकडाऊन करुन आपण गप्प बसलो असे नाही. आपण आरोग्य विषयक सुविधा निर्माण करतो आहोत,"
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख