सलाम या कोरोना वॉरियर्स दांपत्यास! 
Home Minister Anil Deshmukh Applauds Couple about their work.jpg

सलाम या कोरोना वॉरियर्स दांपत्यास! 

मूळचे कळंब (ता. आंबेगाव) येथील देवदत्त प्रभाकर कानडे हे मुंबई पोलिस दलात, तर केईएम रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या त्यांच्या पत्नी सुवर्णा कानडे हे दांपत्य गेली दोन महिन्यांपासून मुंबईत कोरोनाविरुद्ध आपल्या लहान मुलाला घरी ठेऊन कर्तव्य बजावत आहेत.

महाळुंगे पडवळ : मूळचे कळंब (ता. आंबेगाव) येथील देवदत्त प्रभाकर कानडे हे मुंबई पोलिस दलात, तर केईएम रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या त्यांच्या पत्नी सुवर्णा कानडे हे दांपत्य गेली दोन महिन्यांपासून मुंबईत कोरोनाविरुद्ध आपल्या लहान मुलाला घरी ठेऊन कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या या कार्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी "सलाम अशा हजारो योद्धांना', तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी "कोरोना वॉरियर्स पती-पत्नी' अशा शब्दांत ट्‌विटर आणि फेसबुक अकाउंटवरुन कौतुक केले आहे. 

पोलिस देवदत्त कानडे हे गेली दोन महिन्यांपासून जीवावर उदार होऊन दिवस-रात्र सेवा देत आहेत. त्यांच्या पत्नी सुवर्णा भगत-कानडे 2 फेब्रुवारी 2009 पासून केईएम रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम करत आहे. कोरोना रुग्णांच्या रक्त तपासणी करण्याच्या लॅबमध्ये दिवसाला पाच ते सहा हजार रक्‍त्याच्या नमुन्यांची तपासणी करत आहेत. हे "कोरोना वॉरियर्स' कानडे दांपत्य आपल्या लहान मुलाला घरी एकटं ठेवून कोविड-19 च्या लढ्यात आपले कर्तव्य बजावत आहेत. स्वतःचे कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार यांचा विचार न करता कोरोना विरुद्धच्या लढाईत स्वत:ला वाहून घेतलं आहे. आपल्या सुट्या रद्द करून हे कर्मचारी कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहेत. 

पोलिस आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कुटुंबापासून दूर राहून आपले काम करावे लागत आहे. घरी जाण्यासाठी वेळ मिळाला तरी, घरच्यांना स्वत:पासून दूरच ठेवावे लागत आहे. असाच एक भावनिक फोटो राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या ट्‌विटर आणि फेसबुक अकाउंटवरून पोलिस नाईक या पदावर काम करणारे देवदत्त कानडे आणि केईएम रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या त्यांच्या पत्नी सुवर्णा कानडे या पती-पत्नीचा फोटो शेअर करून "सलाम अशा हजारो योद्धांना' व "कोरोना वॉरियर्स' म्हणून कौतुक केले आहे. 


कोरोनाविरुद्धची लढाई नक्की जिंकणार 

कोविड-19 च्या लढाईत वातावरण तणावविरहीत ठेवून आम्ही सर्वजण काम करत आहोत. सरकारचे प्रयत्न, जनतेची साथ या जोरावर आपण कोरोनाविरुद्धची लढाई नक्की जिंकणार आहोत. महाराष्ट्रातील जनता प्रशासनास योग्य सहकार्य देत आहे आणि आम्हाला विश्वास आहे की कोरोनाच्या संकटावर आपण नक्कीच मात करू, असे पोलिस नाईक देवदत्त कानडे आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुवर्णा कानडे यांनी सांगितले. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in