लॉकडाउनसाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम : राज्यात यात्रा, मिरवणुका, आंदोलन, मोर्चांना बंदी - Chief Minister Uddhav Thackeray's eight-day ultimatum for lockdown | Politics Marathi News - Sarkarnama

लॉकडाउनसाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम : राज्यात यात्रा, मिरवणुका, आंदोलन, मोर्चांना बंदी

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

नियम पाळले नाहीतर आपल्याला पुन्हा एकदा कडक लॉकडाउन करावे लागेल.

मुंबई : राजकीय, धार्मिक आणि सामजिक कार्यांना राज्यात काही दिवस बंदी असणार आहे. यात मिरवणुका, मोर्चे, आंदोलन, यात्रा आदींचा समावेश असणार आहे. तसेच, लॉकडाउन करायचा का? या प्रश्‍नाचे उत्तर येत्या आठ दिवसांत जनतेकडूनच घेणार आहे. 

ज्यांना लॉकडाउन हवे असेल ते विना मास्कचे फिरतील आणि ज्यांना लॉकडाउन नको आहेत, ते मास्क घालून सर्व नियमांचे पालन करतील, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनसाठी जनतेलाच आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. 

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता. 21 फेब्रुवारी) सायंकाळी जनतेशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधला. त्यात त्यांनी अनेक मुद्यांवर समजावून सांगत असताना काही गोष्टींसाठी इशाराही दिला आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की पूर्वी राज्यात 2 ते अडीच हजार रुग्ण सापडत होते. त्यात आणखी दोन हजारांची भर पडत आहे. आज एकाच दिवसात संपूर्ण राज्यात सात हजार रुग्ण सापडले आहेत. राज्यात सध्या 53 हजार ऍक्‍टिव्ह रुग्ण आहेत. राज्याच्या दारावर कोरोनाची दुसरी लाट धडका मारत आहे आणि ती चिंताजनक आहे. 

"कोरोना योद्‌ध्यांनी दिलेल्या बलिदानामुळेच संसर्ग आटोक्‍यात आला होता. मात्र, सगळं सुरू झालं आणि रुग्ण वाढू लागले आहेत. एकीकडे कोविड योद्धांचा सत्कार करायचा आणि दुसरीकडे हे उघडा, ते उघडा असे म्हणत राहायचं, हे योग्य नाही. सुरुवातीच्या काळात रुग्णसंख्या आणि बेड याची संख्या विषम होती. मात्र, सध्याची कोरोनाची पिक पिरीयडसारखी संख्या पाहता सध्याचे बेड अपुरे पडू शकतात,त्यामुळे काही प्रमाणात बंधने घालावी लागतील,'' असे ठाकरे यांनी नमूद केले. 

अमरावती विभागात उद्यापासून बंधने 

विदर्भातील काही जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अमरावती, वाशिम, यवतमाळ, अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांत उद्यापासून काही बंधने असणार आहेत. याबाबतचे निर्णय स्थानिक पातळीवरील जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. शासकीय कार्यक्रमसुद्धा आम्ही झूम मिटिंग पद्धतीने घेणार आहोत. असे मुख्यमंत्री म्हणाले. 

पक्ष वाढवा; कोरोना नाही 

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आमच्याही (राजकीय) कार्यक्रमावर बंधने आणावी लागतील. सर्वच राजकीय पक्षांना मी विनंती करणार आहे. राजकीय पक्षांनीही आपल्या कार्यक्रमालाही कात्री लावावी. आपण आपले पक्ष वाढवू आणि कोरोना नाही, असे आवाहन ठाकरे यांनी केले. 

लस आल्यामुळे काही प्रमाणात शिथिलता आली. पण सध्या राज्यात कोरोना डोकं वर काढत आहे. काही देशांत सध्या लॉकडाउन सुरू आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संपर्क टाळायला हवा. नियम पाळले नाहीतर आपल्याला पुन्हा एकदा कडक लॉकडाउन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी जनतेला दिला. 

"मी जबाबदार' नवी मोहीम 

मी पूर्वी "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अशी मोहिम हाती घेतली होती. त्याचा आपल्याला फायदाही झाला. त्याच पार्श्‍वभूमीवर मी नवीन मोहीम मी जाहीर करणार आहे आणि ती "मी जबाबदार' अशी मोहीम असेल. या मोहिमेत हात धुणे, मास्क वापरणे, शारीरिक अंतर पाळणे, सॅनिटायझिंग करणे, या उपाय योजना कटाक्षाने पाळण्याबाबतच्या सूचना असतील. कारण नसताना गर्दी टाळूया. ऑफीसच्या वेळा विभागून करण्याची मागणी मी पंतप्रधानांकडे केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख