कंगना प्रकरणात बोलल्यानेच सरनाईकांवर कारवाई : छगन भुजबळांचा आरोप - Chagan Bhujbal Reacts on ED Actions against Pratap Sarnaik | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

कंगना प्रकरणात बोलल्यानेच सरनाईकांवर कारवाई : छगन भुजबळांचा आरोप

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

विरोधी पक्षातील एखादा नेता जो  व्यक्ती केंद्र सरकारच्या विरोधात जास्त बोलेल त्याला ईडीची भीती दाखवली जात आहे. मी बोललो म्हणून माझ्यावर केसेस दाखल केल्या. पवार साहेब निवडणुकीच्या काळात बोलले तर त्यांना नोटीस पाठवली जात आहे. त्यामुळे सुडापोटी ही कारवाई केली जात आहे, असा आरोप राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी येथे केला.

मुंबई :  विरोधी पक्षातील एखादा नेता जो  व्यक्ती केंद्र सरकारच्या विरोधात जास्त बोलेल त्याला ईडीची भीती दाखवली जात आहे. मी बोललो म्हणून माझ्यावर केसेस दाखल केल्या. पवार साहेब निवडणुकीच्या काळात बोलले तर त्यांना नोटीस पाठवली जात आहे. त्यामुळे सुडापोटी ही कारवाई केली जात आहे, असा आरोप राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी येथे केला.

आज राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात जनता दरबार कार्यक्रमावेळी ते बोलत होते. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात ईडीने केलेल्या कारवाईबाबत त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ही कारवाई सुडापोटी असल्याचे ते म्हणाले. "प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचा छापा पडल्याचे वृत्त मी पाहिले आहे. सरनाईक हे सातत्याने कंगना आणि अर्णबच्या प्रकरणात महाराष्ट्राच्या बाजूने बोलत होते म्हणूनच त्यांच्यावर ईडी कडून छापा टाकला गेला आहे," असा आरोप त्यांनी केला.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असे ते म्हणाले. भाजपाकडून सातत्याने सरकार पाडण्याच्या वक्तव्याचा अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी चांगलाच समाचार घेतला. "जे स्वप्नरंजन करुन घेत असतील आणि त्यात त्यांना आनंद मिळत असेल तर त्यांचा आनंद आपण का भंग करावा? भाजपाला सरकार पडण्याची स्वप्ने पडत असतील तर त्यांनी जरूर स्वप्ने पहावीत," असा टोला देखील भुजबळ यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्या ठाणे येथील घर आणि कार्यालयांवर आज सकाळी ईडीच्या पथकाने धाडी टाकत कारवाई केली. यामुळे शिवसेनेमधून संतप्त प्रतिक्रिया उमटायला सुरवात झाली आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ईडी असो की आणखी कुणी, आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. कितीही प्रयत्न केले तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकार व या सरकारमधील नेते कुणाला शरण जाणार नाहीत, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. हे सरकार पुढील चार वर्ष आणि त्यापुढेही पंचवीस वर्ष कायम राहील, असेही राऊत यांनी निक्षून सांगितले.

प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर ईडीकडून धाडी टाकल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संजय राऊत यांनी तर भाजप आणि केंद्रातील सरकारला आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही, हिंमत असेल तर घरी या  आणि अटक करून दाखवा, असे खुले आव्हानच दिले आहे. ईडीच्या कारवाईनंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना संजय राऊत म्हणाले,  "केंद्रातील भाजप सरकारकडून सुडाचे राजकारण देशभरात सुरू आहे. ईडीने एखाद्या राजकीय पक्षाची शाखा असल्या सारखं वागू नये,''
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख