Central Railway to Produce Solar Energy to Reduce Cost | Sarkarnama

सौरऊर्जा निर्मितीसाठी मध्य रेल्वेचा पुढाकार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 29 जुलै 2020

मध्य रेल्वेने पाच विभागात आणि चार कार्यशाळांमध्ये एकूण १४.३७९ मेगावॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पांसाठी योजना आखली आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, पुणे आणि विविध कारशेड, प्रशासकीय इमारती, रेल्वे स्थानकांच्या फलाटांच्या छतावर ४.९२ मेगावॉट क्षमतेचे स्वयंचलित यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे

मुंबई  : जागतिक तापमानवाढ कमी करण्याच्या उपाययोजनांमध्ये आता मध्य रेल्वेनेही पुढाकार घेतला असून २०३० पर्यंत मोठ्या प्रमाणात सौर आणि पवनऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे रेल्वेची विजेवरील कोट्यवधी खर्चाची बचत होणार असल्याचा दावाही रेल्वेतर्फे करण्यात आला आहे.

मध्य रेल्वेने पाच विभागात आणि चार कार्यशाळांमध्ये एकूण १४.३७९ मेगावॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पांसाठी योजना आखली आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, पुणे आणि विविध कारशेड, प्रशासकीय इमारती, रेल्वे स्थानकांच्या फलाटांच्या छतावर ४.९२ मेगावॉट क्षमतेचे स्वयंचलित यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. यामधून दर वर्षी ६.४ लाख युनिट्‌स ऊर्जेची निर्मिती होत असून वर्षाला ४.१ कोटी रुपयांची बचत होते आहे; तर उर्वरित सौरऊर्जा प्रकल्प स्थापनेच्या विविध टप्प्यात असून भविष्यात १२ लाख युनिट उत्पादित होऊन वर्षाला ७.३७ कोटींची बचत होणार असल्याचे रेल्वेने सांगितले आहे.

वर्षाला १०७ कोटींची बचत
१०९ मेगावॉट क्षमतेच्या ऊर्जा प्रकल्पांची स्थापना करण्यासाठी रुळाशेजारील मोकळा पट्टा तसेच निरुपयोगी जमीन वापरण्यात येणार आहे. या ठिकाणी भविष्यात वर्षाला १४३ लाख युनिट ऊर्जा उत्पादन होईल. यामुळे बिलात ४३ कोटी रुपयांची बचत होणार आहे. त्याचप्रमाणे, मोकळ्या भूभागांवर एकूण ७१ मेगावॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पांची योजना आखली गेली आहे. त्यामुळे वर्षाला ९३ लाख युनिट वीज तयार होईल आणि ६४ कोटी रुपयांची बचत होऊन रेल्वेच्या वार्षिक खर्चाच्या बिलात एकूण १०७ कोटींची रुपयांची बचत होण्याचा अंदाज रेल्वेने वर्तवला आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख