The central government has not given a single rupee to the victims of nature cyclone: ​​Tatkare | Sarkarnama

निसर्गग्रस्तांना केंद्र सरकारने एक रुपयाही दिला नाही

सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 26 जून 2020

प्रचलित नुकसान भरपाईच्या निकषांना बगल देत राज्य सरकारने तीनपट जादा मदत निसर्ग चक्री वादळात नुकसान झालेल्या नागरिकांना दिली आहे. मात्र, केंद्र सरकारकडून अद्याप एका रुपयाचीही मदत देण्यात आली नाही.

अलिबाग : प्रचलित नुकसान भरपाईच्या निकषांना बगल देत राज्य सरकारने तीनपट जादा मदत निसर्ग चक्री वादळात नुकसान झालेल्या नागरिकांना दिली आहे. मात्र, केंद्र सरकारकडून अद्याप एका रुपयाचीही मदत देण्यात आली नाही, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी केली. 

अलिबाग तालुक्‍यातील बेलोशी येथे शुक्रवारी (ता. 26 जून) मदत वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खासदार सुनील तटकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. 

खासदार तटकरे म्हणाले की रायगड जिल्ह्यात आतापर्यंत 77 कोटी 50 लाख 82 हजार रुपयांच्या तत्काळ मदतीचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर दीर्घ मदतीसाठीही राज्य सरकारने निर्णय घेतले असून याचा फायदा निसर्ग चक्री वादळाचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्तांना पुन्हा संसार सावरण्यासाठी होणार आहे. 

राज्य सरकारकडून असे भरीव प्रयत्न होत असताना केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही मदत जाहीर झालेली नाही. "एनडीआरएफ'चे केंद्रीय पथक नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून गेले आहे. कोकणात आलेल्या नैसर्गिक आपत्तीची पूर्ण कल्पना केंद्र सरकारला आहे. परंतु मदत देण्याबद्दल निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. 

राज्य सरकारने रायगड जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना आतापर्यंत भरीव मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वादळग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर तातडीने 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. पंचनामे करण्याचे काम होत असताना नुकसानग्रस्तांना सुधारित नियमांनुसार मदत निधीचे वाटप वेगाने सुरू आहे. हे वाटप निपक्षपातीपणे होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

ज्या व्यक्ती या वाटपात हस्तक्षेप करून नुकसानग्रस्तांवर अन्याय करतील; त्यांच्यावर कारवाईच्या सूचना देखील दिल्या आहेत. मच्छिमार, बागायतदार, पोल्ट्री व्यावसायिक, शेतकरी, घरांचे अंशतः नुकसान झालेले घरमालक या मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आश्‍वासन सुनील तटकरे यांनी या वेळी बोलताना दिले. 

कोरोनाच्या उपाय योजनांसाठी 27 रोजी बैठक 

रायगड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला पायबंद बसावा, यासाठी तातडीने निर्णय घेण्यासाठी शनिवार (ता. 27 जून) जिल्ह्यातील सर्व आमदार, संबंधित विभागाचे अधिकारी यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत भविष्यात कोणत्या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे, यावर चर्चा केली जाणार असल्याचे खासदार तटकरे यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख