Bollywood will also boycott Chinese goods | Sarkarnama

बॉलिवूडही चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकणार 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 20 जून 2020

भारत आणि चीनमधील तणाव वाढत चाललेला आहे. आपले 20 सैनिक चीनने केलेल्या हल्ल्यात हुतात्मा झाले आहेत. त्यामुळे भारतात चीनविरुद्ध कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतही आता चीनबद्दल तीव्र भावना व्यक्त होत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत चीनी वस्तूंवर आता बहिष्कार टाकण्यात येणार आहे.

मुंबई : भारत आणि चीनमधील तणाव वाढत चाललेला आहे. आपले 20 सैनिक चीनने केलेल्या हल्ल्यात हुतात्मा झाले आहेत. त्यामुळे भारतात चीनविरुद्ध कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतही आता चीनबद्दल तीव्र भावना व्यक्त होत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत चीनी वस्तूंवर आता बहिष्कार टाकण्यात येणार आहे. तसेच, चीनमध्ये आता बॉलिवूडचे चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णयही घेण्यात येणार आहे. 

ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्‍यामलाल गुप्ता यांची स्वाक्षरी असलेले एक पत्रक या निर्णयाला अनुसरून जाहीर करण्यात आले आहे. त्यात भारतीय चित्रपटसृष्टीने कोणत्याही चायनीज वस्तूंचे प्रमोशन करू नये. कोणत्याही प्रकारच्या चीनी वस्तूंचा वापर चित्रिकरणात करू नये. चित्रीकरणप्रसंगी अनेक उच्च तंत्रज्ञान हे अन्य बाहेरील देशांमधूनही येत असते; मात्र आता अन्य देशांचा पर्याय निवडावा; मात्र चिनी वस्तूंचा वापर थांबवावा, असे आवाहन गुप्ता त्यांनी केले आहे. 

देशाच्या अस्मितेपुढे जाहिराती थांबवा 

हिंदी चित्रपटसृष्टीतील काही मोठमोठ्या प्रॉडक्‍शन हाऊसेसनी चिनी कंपन्यांबरोबर काही करार केले असतील किंवा करार करण्याच्या विचारात असतील तर त्यांनी ते करू नयेत. सगळे व्यवहार रद्द करण्यात यावेत. करोडो रुपयांच्या संधी आल्या तरी भारताच्या अस्मितेपुढे त्यांच्या जाहिराती करणे थांबवावे, असे आवाहनही या पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. 

इम्पा सर्वांच्या संमतीने निर्णय घेणार 

आमीर खानचा दंगल तसेच आयुष्मानचा अंदाधून आदी चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित झाले होते. या चित्रपटांनी घवघवीत व्यवसाय केला होता. पण, आता हिंदी चित्रपटदेखील चीनमध्ये प्रदर्शित होणार नाहीत असे समजते. याबाबत इम्पाचे अध्यक्ष टी. पी. अगरवाल म्हणाले, की आम्ही अजून काही असा निर्णय घेतलेला नाही. आता आमची बैठक होईल आणि सगळ्यांच्या संमतीने हा निर्णय होईल. 

चीनमधून होणारी आयात बंद करण्याची मागणी 

चीन हा धोकेबाज देश आहे. धोका देऊन त्याने लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय सैन्यावर हल्ला केला आहे. या भ्याड हल्ल्याचा आपण तीव्र निषेध करतो. चीनला धडा शिकविण्यासाठी एकदा चीनशी आरपारचे युद्ध लढले पाहिजे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. 

दरम्यान, चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी भारतीय नागरिकांनी चीनी मालावर बहिष्कार टाकला पाहिजे. व्यापार उद्योग जगातला माझे आवाहन आहे की चीनमधून कोणत्याही प्रकारच्या सामग्रीची आयात करू नका. चीनमधून मालाच्या आयातीवर बंदी आणावी; निर्यातबंदी कारावी, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांनी केले आहे. 

चीनी वस्तूंबद्दल आम्हाला अजिबात प्रेम नाही. चीनी वस्तूंवर आम्ही नक्कीच बहिष्कार टाकू. सरकारनेही आम्हाला तसे सांगितले पाहिजे. 
- मुकेश भट, निर्माते 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख