आत्ता बोला! बजेट सादर करताना महापालिकचे सहआयुक्तच प्यायले सॅनिटायझर... - BMC Joint Municipal Commissioner Ramesh Pawar accidentally drinks hand sanitiser | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

आत्ता बोला! बजेट सादर करताना महापालिकचे सहआयुक्तच प्यायले सॅनिटायझर...

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

मुंबई महापालिकेचे सहआयुक्तच पाणी समजून सॅनिटायझर प्यायल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. 

मुंबई : राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेदरम्यान यवतमाळमध्ये १२ बालकांना पोलिओचा डोस म्हणून सॅनिटायझर पाजण्यात आल्याची घटना ताजी आहे. त्यातच मुंबई महापालिकेचे सहआयुक्तच पाणी समजून सॅनिटायझर प्यायल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. 

पोलिओचा डोस म्हणून सॅनिटायझर पाजण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर सर्व बालकांची प्रकृती बिघडल्याने त्यांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी डॉक्टर, अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकेला तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले आहे. दरम्यान, आशा सेविकेने डॉक्टरांवर ठपका ठेवला आहे. 

मुंबई महापालिकेमध्ये आज बजेट सादर करण्यात आले. सहआयुक्त रमेश पवार यांनी शिक्षण बजेट सादर केले. हे बजेट सादर करण्यापूर्वी ही घटना घडली आहे. त्यांच्या समोर टेबलवर सॅनिटायझरची बाटली होती. बजेट सादर करण्याआधी पाणी पिण्यासाठी म्हणून त्यांनी चुकून सॅनिटायझरची बाटली घेऊन ती तोंडाला लावली. त्यांच्या मागे उभ्या असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर ते त्यांच्यादिशेने धावून गेले. तोपर्यंत पवार यांनाही चूक लक्षात आली होती. त्यानंतर लगेचच ते पाण्याची बाटली घेऊन तिथून थोड्या वेळासाठी सभागृहातून बाहेर गेले. 

दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्‍यातील कापसी (कोपरी) येथे पोलिओ लसीकरणादरम्यान १२ लहान मुलांना पोलिओचा डोस म्हणून सॅनिटायझर पाजण्यात आले होते. ही सर्व बालके १ ते ५ या वयोगटातील आहेत. मुलांना उलट्यांचा त्रास झाल्याने पालकांच्या लक्षात ही बाब आली. त्यामुळे 31 जानेवारीला रात्रीच १२ बालकांना यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. 

या घटनेची मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी गंभीर दखल घेतली. चोवीस तासांच्या आत जनसमुदाय आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका या तिघांनाही डॉ. पांचाळ यांनी सेवेतून बडतर्फ केले आहे. तसेच, दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 

जनसमुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गावंडे, आशा सेविका संगीता मसराम, अंगणवाडी सेविका यांना बडतर्फ करण्यात आले  आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण मसराम, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मनवर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्याकडून खुलासा आल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. 

याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले की, पोलिओ लस समजून मुलांना सॅनिटाझर पाजण्यात आल्याचे आरोग्य केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी काही वेळाने सर्व मुलांना पोलिओची लस दिली. घटना घडल्यानंतर उशिरापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आलेली नव्हती. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख