मुंबई : "सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोपी करणारी महिला आपल्यालाही गेली दहा वर्षांपासून ब्लॅकमेल करीत होती,' असा आरोप करून भारतीय जनता पक्षाचे नेते कृष्णा हेगडे यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांना तोंडावर पाडले आहे. कारण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार किरीट सोमय्या व इतर नेत्यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सावध भूमिका घेतली होती. आता हेगडे यांच्या या आरोपानंतर हे भाजप नेते काय भूमिका घेणार, याकडे लक्ष असणार आहे.
मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या महिलेने बलात्काराचा आरोप करत पोलिसांत तक्रार दिली होती. त्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मुंडे यांच्या प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने एक बैठकही घेतली होती. मात्र, हेगडे यांच्या आरोपानंतर या प्रकरणात मुंडे यांच्या विरोधातील आरोपाची धार काहीसी बोथट झाली आहे.
काय म्हणाले हेगडे?
"संबंधित महिला ही मला 2010 पासून संबंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल करत होती. वेगवेगळ्या नंबरवरून मला फोन आणि व्हॉट्स ऍप मेसेज करायची. हे हनिट्रॅपचे प्रकरण आहे, हे लक्षात आल्यानंतर तिला टाळण्याचा प्रयत्न केला. पण, ती पाच ते सहा वर्षे माझा पिच्छा पुरवत होती. पण मी तिला दूर ठेवले,'' असा दावा भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी केला.
"तिने मला "आप मुझे भूल गये क्या?' असा मेसेज सहा आणि सात जानेवारी 2021 रोजी पुन्हा केला. त्यानंतर आठ आणि नऊ तारखेला मुंडे यांचे प्रकरण बाहेर आले. मला वाटलं की अशी जी लोकं आहेत, जी दुसऱ्याला ब्लॅकमेल करतात, त्यांचा भांडाफोड करण्यासाठी मी एवढ्या वर्षांनी बाहेर येऊन हे सांगत आहे. कारण, आज ते मुंडे यांना फसवत आहेत, ते उद्या दुसऱ्या कोणाला फसवतील. ते रोखण्यासाठी मी हे सांगत आहे. यात कोणतंही राजकारण नाही. मला जो अनुभव आला, तो मी सर्वांसमोर मांडला,'' असे हेगडे यांनी सांगितले.
भाजप नेत्यांची वक्तव्ये
मुंडे यांच्या वक्तव्याने संशय निर्माण झाला : फडणवीस
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात दुसऱ्या पत्नीच्या बहिणीने बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणात मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संशयाचे वातावरण आहे. त्यामुळे आता पोलिसांनीच या प्रकरणातील सत्य बाहेर आणावे, असे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.
किरीट सोमय्यांचे निवडणूक आयोगाला पत्र
मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रात आपल्या दुसऱ्या विवाहाची माहिती लपविल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट मोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबतची लेखी तक्रार केली आहे. सोमय्या यांनी निडवणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात पाच महत्त्वाचे मुद्दे नमूद करत मुंडे यांच्यावर आरोप केले होते.
मुंडे यांनी दुसरं लग्न केल्याचं मान्य केलं आहे. दुसऱ्या पत्नीची आणि मुलांची काळजी घेत असल्याचंही त्यांनी कबूल केलं आहे. मुंडे यांनी दुसऱ्या पत्नीसाठी मुंबईत फ्लॅट घेऊन दिल्याचंही मान्य केलंय. शिवाय मुलांना आपलं नाव दिल्याचीही कबुली त्यांनी दिली. पण ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मुंडे यांनी आपल्या शपथपत्रात दुसऱ्या विवाहाची माहिती लपवली होती. त्यामुळे या प्रकरणाची दखल घेऊन आपण योग्य ती कारवाई करावी, असं सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
धनंजय मुंडे आत्मपरीक्षण करतील काय? : चंद्रकांत पाटील
मुंडे त्यांच्यावर झालेले आरोप पाहता त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा. ज्या व्यक्तीच्या विरोधात आरोप होतात, त्या व्यक्तीला पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसतो. पण गेंड्याच्या कातडीचे मंत्री व सरकार त्याबाबत आत्मपरीक्षण करतील का, हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळे मुंडे राजीनामा देतील असे वाटत नाही, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले होते.
पाटील म्हणाले, "भारतीय जनता पक्षाच्या महिला शाखेतर्फे पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात मुंडेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. यापुढेही ही मागणी लावून धरली जाईल. त्यात भाजपचे प्रदेश पदाधिकारी सहभागी होतील.''

