मुंबईत भाजपने वाॅर रुमही केले सुरु - BJP Started War Room in Mumbai For Municipal Elections | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबईत भाजपने वाॅर रुमही केले सुरु

सरकारनामा ब्युरो
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

चौदा महिन्यांवर आलेल्या महापालिका निवडणुकीची तयारी म्हणून लोकांच्या नागरी समस्या सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सेवासेतू वॉररूम तयार केले असून समस्या मांडण्यासाठी लौकरच हेल्पलाईन नंबरही जाहीर केला जाणार आहे. 

मुंबई :  चौदा महिन्यांवर आलेल्या महापालिका निवडणुकीची तयारी म्हणून लोकांच्या नागरी समस्या सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सेवासेतू वॉररूम तयार केले असून समस्या मांडण्यासाठी लौकरच हेल्पलाईन नंबरही जाहीर केला जाणार आहे. 

या सेवासेतू वॉररूमचे उद्घाटन नुकतेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, पक्षाचे मुंबई शहराध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम यांच्या उपस्थितीत झाले. या वॉररुमच्या हेल्पलाईनवर मुंबईकर आपल्या वॉटर-मीटर-गटर सह कोणत्याही नागरी समस्या मांडू शकतील.

त्या समस्या कोणत्या ठिकाणच्या आहेत तसेच शासनाच्या कोणत्या खात्याशी संबंधित आहेत, त्यानुसार भाजप कार्यकर्ते त्या समस्या त्या अधिकाऱ्याकडे नेऊन तेथे मांडतील व त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करतील. त्यासाठी भाजपचे खासदार, आमदार, नगरसेवक आदी लोकप्रतिनिधीदेखील विचारविनिमय आणि साह्य करतील, अशी ही योजना आहे. 

दादरच्या भाजप च्या शहर मुख्यालयातील या वॉररूममध्ये वीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. येथे नागरिक कोणत्या प्रकारच्या तक्रारी करतात ते पाहून नंतर या कामाची व्याप्ती वाढविली जाईल,  जरुर तर हे कार्यालय 24 तासही सुरु ठेवले जाईल, असे कार्यालयप्रमुख प्रतीक कर्पे म्हणाले. 

तर फडणवीस यांनीही या कल्पनेचे कौतुक केले. नागरी समस्यांनी त्रस्त झालेल्या मुंबईकरांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरेल. सामान्यजन तसेच लोकप्रतिनिधी यांच्यातील अंतर नष्ट करण्याचे काम ही योजना करेल, असेही ते म्हणाले.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख