भाजप खासदाराने केली मुंबई पालिकेची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार 

बोरीवली (पू) येथील डिस्कव्हरी या इमारतीत कोरोना रुग्ण सापडल्याने मुंबई महापालिकेने ती संपूर्ण इमारतच सील केली आहे. या प्रकरणी उत्तर मुंबईचे भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार केली आहे. त्यात त्यांनी राज्य सरकारला याबाबत मार्गदर्शक सूचना करण्याची विनंती केली आहे.
BJP MP complaint against Mumbai Municipal Corporation to Union Health Minister
BJP MP complaint against Mumbai Municipal Corporation to Union Health Minister

मुंबई : बोरीवली (पू) येथील डिस्कव्हरी या इमारतीत कोरोना रुग्ण सापडल्याने मुंबई महापालिकेने ती संपूर्ण इमारतच सील केली आहे. या प्रकरणी उत्तर मुंबईचे भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार केली आहे. त्यात त्यांनी राज्य सरकारला याबाबत मार्गदर्शक सूचना करण्याची विनंती केली आहे. 

इमारतीच्या पदाधिकाऱ्यांनी सुयोग्य उपाय योजना न केल्याने इमारतीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे, असे पत्र देऊन आर मध्य विभागाच्या सहायक आयुक्तांनी ही इमारत 27 जुलैपासून 14 दिवस सील केली आहे. या कालावधीत इमारतीतून कोणीही व्यक्ती बाहेर पडणार नाही, हे पाहण्याची जबाबदारी इमारतीच्या पदाधिकाऱ्यांची असेल.

बाहेर पडलेल्या व्यक्तीला विलगीकरण केंद्रात ठेवले जाईल व साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई केली जाईल. रहिवाशांना जीवनावश्‍यक वस्तू मिळतील, याची जबाबदारीही पदाधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे. सोसायटीचे पदाधिकारी म्हणून जबाबदारी व्यवस्थित पार न पाडल्यास तुमच्याविरुद्धही कारवाई केली जाईल, असाही इशारा त्या पत्रात देण्यात आला आहे. 

या प्रकरणी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी हस्तक्षेप करून राज्य सरकारला मार्गदर्शक सूचना द्याव्यात, असे पत्र खासदार गोपाळ शेट्टी यांनी पाठवले आहे. सध्या अनलॉकिंग प्रक्रिया सुरु असताना संपूर्ण इमारत सील करण्याचा मुंबई महापालिकेचा निर्णय अतर्किक आहे. 

सध्या अनेक नोकरदार आणि व्यावसायिक आपल्या कामधंद्यासाठी बाहेर पडू लागले असून अशा निर्णयामुळे त्यांच्यात भीती पसरेल. मुंबई शहरातील कोरोना विषाणूचा फैलाव आता कमी होत असल्याने असे कठोर निर्णय घ्यायची काहीच गरज नाही. त्या इमारतीमधील संशयितांना महापालिका विलगीकरण केंद्रात किंवा रुग्णालयात ठेवता येऊ शकते, असेही पत्रात दाखवून देण्यात आले आहे. 

अशा प्रकारे संपूर्ण इमारत सील करण्याऐवजी परिस्थिती सामान्य करण्यासाठी अन्य काही सुनियोजित उपाय करता येतील. मात्र, अनिश्‍चित काळासाठी लोकांना घरात डांबून ठेवणे, हा उपाय होऊच शकत नाही.

सध्याचा कोरोना विषाणूचा फैलाव थांबविण्यासाठी काय करावे व काय करू नये, हे महाराष्ट्र सरकारला कळत नाही, असे मला वाटते. त्याचमुळे लोकांच्या हिताविरुद्ध निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे असे घबराट पसरवणारे निर्णय न घेण्याच्या सूचना आपण महाराष्ट्र सरकारला द्यावात, अशी विनंतीही खासदार गोपाळ शेट्टी यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांना केली आहे. 

Edited By Vijay dudhale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com