BJP MLA Ram Kadam Opposing Car Purchase for Education Minister | Sarkarnama

शिक्षणमंत्र्यांसाठी नव्या गाडीची खरेदी : राम कदमांची टीका

सरकारनामा ब्युरो
रविवार, 5 जुलै 2020

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासाठी नवी मोटार खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसा जीआरही शासनाने काढला आहे. त्याला आमदार राम कदम यांनी विरोध केला आहे

मुंबई : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासाठी नवी मोटार खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसा जीआरही शासनाने काढला आहे. मात्र, कोरोनाच्या संकटात राज्य सरकारकडे पगार द्यायला पैसे नसताना महागडी गाडी खरेदी करण्याचा घाट घातला जात असल्याबद्दल भाजपचे आमदार राम कदम यांनी त्यावर टीका केली आहे. 

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा आदेश जारी केला आहे. इनोव्हा क्रिस्टा २.४ झेड एक्स असे या गाडीच्या माॅडेलचे नांव आहे. या गाडीची किंमत २२ लाख ८३ हजार रुपये आहे. ही गाडी खरेदी करण्यास वित्त विभागाच्या राज्यस्तरीय वाहन आढावा समितीने तसेच मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणून ही गाडी खरेदी करण्यात येत असल्याचेही शासनाच्या या आदेशात म्हटले आहे. संबंधित गाडीचे पैसे आॅनलाईन अदा करावेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे

दरम्यान, भाजपचे आमदार राम कदम यांनी ट्वीटद्वारे या निर्णयावर टीका केली आहे. 'महाराष्ट्रातील जनतेला एका पैशाचीही मदत न देणारे सरकार मंत्र्यांसाठी कोट्यवधी रुपयांच्या मोटारी खरेदी करणार आहे. एकीकडे शासकीय कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत, असे सांगत पोलिसांचेही पगार कापणाऱ्या महाविकास आघाडीने प्रथम कोरोना वाॅरिअर्सचे वेतन द्यावे, असे कदम यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख