गुन्हेगारीचा शिक्का असलेले अर्धा डझन ठाकरेंच्या मंत्रीमंडळात.... - BJP Leader Atul Bhatkhalkar taunts Anil Deshmukh over Jail Tourism | Politics Marathi News - Sarkarnama

गुन्हेगारीचा शिक्का असलेले अर्धा डझन ठाकरेंच्या मंत्रीमंडळात....

सरकारनामा ब्युरो
रविवार, 24 जानेवारी 2021

राज्याच्या गृहखात्याने २६ जानेवारीपासून 'जेल पर्यटन' योजना सुरु केली आहे. यात राज्यातल्या विविध तुरुंगांना विद्यार्थी तसेच नागरिकांना भेट देता येणार आहे. यावर भातखळकर यांनी गृहखात्याला व महाविकास आघाडीला चिमटा काढला आहे

मुंबई :  गुन्हेगारीचा शिक्का असलेले किमान अर्धा डझन मंत्री ठाकरे सरकारच्या मंत्री मंडळात आहेत.आरोपी दत्तक योजने अंतर्गत ठाकरे सरकार मधील या गुन्हेगार मंत्र्यांचेही समुपदेशन करावे अशी मागणी मी आज मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे, अशी माहिती भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीटद्वारे केली आहे.

राज्याच्या गृहखात्याने २६ जानेवारीपासून 'जेल पर्यटन' योजना सुरु केली आहे. यात राज्यातल्या विविध तुरुंगांना विद्यार्थी तसेच नागरिकांना भेट देता येणार आहे. यावर भातखळकर यांनी गृहखात्याला व महाविकास आघाडीला चिमटा काढला आहे. ''येत्या २६ जानेवारीपासून महाराष्ट्रात तुरुंग पर्यटन सुरु होणार असू मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ होत आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे तुरुंग पर्यटन खात्यासाठी आपल्याकडे सुयोग्य मंत्री मंत्रीमंडळातच आहेत,'' असा चिमटा भातखळकर यांनी काढला आहे. 

''भारताच्या स्वातंत्र्य इतिहासात कारागृहांचे विशेष महत्व आहे. या कारागृहात स्वातंत्र्य संग्रामातील थोर नेते महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, पंडीत जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू यांच्यासह इतर नेते बंदिस्त होते. या कारागृहांचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता, येत्या २६ जानेवारीपासून राज्यात आम्ही 'कारागृह पर्यटन' ही अभिनव संकल्पना राबविणार आहोत. या पर्यटनाचा शुभारंभ पुण्यातील १५० वर्षे जुन्या येरवडा कारागृहातून केला जाणार आहे. येरवडा तुरुंगात अनेक थोर स्वातंत्र्य सैनिक बंदी होते. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील महत्वाचा 'पुणे करार' येरवडा तुरुंगातील आंब्याच्या झाडाखाली झाला होता. याशिवाय स्वातंत्र्य संग्रामातील चाफेकर बंधू हे देशासाठी याच ठिकाणी शहीद झाले. २६/११ हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला येरवड्यातच फासावर लटकविण्यात आले होते. जनतेला हा इतिहास समजावा या उद्देशाने पहिल्या टप्प्यात येरवडा तुरुंगातून कारागृह पर्यटन सुरू केले जाईल,'' असे राज्याचे गृहमंत्री अनिल देखमुख यांनी काल सांगितले होते. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख