पद वाचवायला मोदींसमोर लोटांगण; कारशेडसाठी अहंकार का?? - BJP Leader Atul Bhatkhalkar Lashes out at Maharashtra CM | Politics Marathi News - Sarkarnama

पद वाचवायला मोदींसमोर लोटांगण; कारशेडसाठी अहंकार का??

सरकारनामा ब्युरो
रविवार, 20 डिसेंबर 2020

भाजप नेत्यांनी कांजूरमार्ग कारशेडच्या जमिनीबाबत केंद्र सरकारशी बोलावं हा मुख्यमंत्र्यांचा शहाजोगपणाचा सल्ला आहे. स्वतःचे मुख्यमंत्रीपद वाचवायला आमदारकी मिळवण्यासाठी ते पंतप्रधानांसमोर लोटांगण घालायला तयार आहेत अशी टीका अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे

मुंबई : भाजप नेत्यांनी कांजूरमार्ग कारशेडच्या जमिनीबाबत केंद्र सरकारशी बोलावं हा मुख्यमंत्र्यांचा शहाजोगपणाचा सल्ला आहे. स्वतःचे मुख्यमंत्रीपद वाचवायला आमदारकी मिळवण्यासाठी ते पंतप्रधानांसमोर लोटांगण घालायला तयार आहेत, पण जनतेच्या कामासाठी मोदींशी बोलायला अहंकार आड येतो, असाच अर्थ त्यातून निघतो, अशी घणाघाती टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.  

त्यांचे हे वक्तव्य म्हणजे खोटारडेपणाचा आणि जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नसल्याचा, पुरावा असल्याची टीकाही भातखळकर यांनी केली आहे. जनतेच्या हिताकरिता अहंकार आणि पुत्रप्रेम बाजूला ठेवावं आणि मुंबईकरांना मेट्रो लवकरात लवकर द्यावी अशी विनंतीही त्यांनी ठाकरे यांना केली आहे.

मुळातच कांजूरमार्गच्या जागेवर अनेक खासगी मालकांचे दावे दिवाणी न्यायालयाच प्रलंबित आहेत. हे सगळं लपवून घाईगडबडीत आणि कायदा पूर्णतः धाब्यावर बसवून ही जमीन हस्तांतरित करण्याचा खटाटोप मुख्यमंत्र्यांनी पुत्रप्रेमापोटी केला. तो उच्च न्यायालयाच्या निकालानंतर अंगलट आल्यामुळेच मुख्यमंत्री असा शहाजोगपणाचा पवित्रा घेत असल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे. 

आज मुख्यमंत्र्यांनी केलेल्या फेसबुक लाईव्ह मध्ये मेट्रो कारशेडच्या निमित्ताने केलेले दावे पूर्णतः अशास्त्रीय असून वस्तुस्थितीला सोडून आहेत. सत्तेवर आल्या आल्या आरेमधील कारशेडच्या कामाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. त्याचवेळेला कांजूरमार्गमध्ये किंवा अन्य कुठे पर्यायी जागा मिळते का याची चाचपणी करायला सुरुवात केली. पण त्यांनीच नेमलेल्या सौनक समितीने आरेमध्येच कारशेड करणे कसे योग्य आहे हे विस्तृतपणे सांगितले. तरीही हा अहवाल कुठल्या मुद्द्यांवर त्यांनी फेटाळला हे त्यांनी जनतेला आज किंवा किंवा विधानसभेत सांगण्याची आवश्यकता होती. पण कुठलेही योग्य उत्तर नसल्यामुळेच अहवाल  जनतेपासून लपवून ठेवल्याची टीका भातखळकर यांनी केली. 

अज्ञानाचे प्रदर्शन
आरेच्या कारशेड प्रोजेक्टमध्ये स्टॅबिलायझेशन चा विषयच नसल्याचे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे म्हणजे या विषयात ते किती अज्ञानी आहेत हेच यातून स्पष्ट होते. या सर्व गोष्टींचा उल्लेख सौनक समितीने आपल्या अहवालात केलेला असतानासुद्धा मुख्यमंत्री धडधडीत खोटे बोलत आहेत असेही भातखळकर यांनी म्हटले आहे. 

स्वतःचे मुख्यमंत्रीपद वाचवण्याकरिता आणि आमदारकीकरिता ते जर पंतप्रधानांना फोन करू शकतात तर मग कांजूरमार्गच्या जागेकरिता फोन करण्यासाठी त्यांचे हात जड झाले आहेत का ? असा प्रश्न पडतो. जनतेच्या हिताच्या कामाच्या वेळेला मात्र अहंकार आड येतो आणि स्वतःची खुर्ची टिकवण्याकरता मात्र लोटांगण घालायला तयार असतात हाच यातून अर्थ निघतो. आरे मध्ये कारशेडचं काम झाले तरी यात भाजपाचा विजय झाला किंवा सरकारचा पराभव झाला असे आम्ही म्हणणार नाही. मुंबईकर जिंकले पाहिजेत आणि मुंबईकरांना लवकरात लवकर ट्रॅफिक जाम मधून सुटण्याकरता मेट्रो मिळाली पाहिजे हीच भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे, असे भातखळकर यांनी संगितले.

Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख