मुंबई : आपल्या दैनिकातील लेखातून फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल बोरुबहाद्दर संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
भाजप आणि शिवसेना यांच्यातील शाब्दिक युद्ध आता हळुहळू गंभीर वळण घेत असल्याचेच यातून दिसत असल्याचेही बोलले जात आहे. देशाची फाळणी करणाऱ्या काँग्रेसबरोबर सध्या राऊत गेले असल्याने त्यांना असे विचार सुचत आहेत, असे सांगून भातखळकर यांनी काँग्रेसवरही कोरडे ओढले आहेत.
संजय राऊत कार्यकारी संपादक असलेल्या दै. सामना मध्ये राऊत यांनी लेख लिहून फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन दिले असल्याचा आरोप भातखळकर यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी समाजमाध्यमांवर व्हिडियो प्रसारित करून राऊत यांचा समाचार घेतला आहे. त्यात त्यांनी राऊत यांचा उल्लेख बोरुबहाद्दर असाही केला आहे.
रोखठोक सदरात राऊत यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत, अशी जळजळीत टीका भातखळकर यांनी केली आहे. देशात विभाजनवादी प्रवृत्ती वाढत असून रशियाप्रमाणे आता भारतातूनही राज्ये फुटून निघतील, अशा स्वरुपाचे देशद्रोही वक्तव्य राऊत यांनी लेखात केल्याचे भातखळकर यांनी दाखवून दिले आहे.
पण अशी विधाने करताना, जी राज्ये फुटली ती रशियातून फुटली नव्हती तर सोव्हिएट युनियन मधून फुटली होती, एवढेही भान राऊत यांना राहिले नाही. पण ज्या काँग्रेसने देशाची फाळणी केली व तुकडे तुकडे गँग चे समर्थन केले, त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यावर राऊत यांना असेच देशद्रोही विचार सुचणार, अशी घणाघाती टीकाही भातखळकर यांनी केली आहे.
अशा स्थितीत देशातल्या फुटीरतावादी प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारी विधाने केल्याबद्दल राऊत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी भातखळकर यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
Edited By - Amit Golwalkar

