चला हवा येऊ द्या...आशिष शेलारांचा राऊतांवर पलटवार! - BJP Leader Answers allegations of Shivsena Leader Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

चला हवा येऊ द्या...आशिष शेलारांचा राऊतांवर पलटवार!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 30 डिसेंबर 2020

ईडीच्या नोटीसांवरुन राज्यात सुरु झालेले राजकारण नवे रंग दाखवत आहे. होळी आणि धुळवडीला दोन महिने बाकी असताना राज्यात मात्र आतापासून राजकीय धुळवड सुरु झाली आहे

मुंबई : ईडीच्या नोटीसांवरुन राज्यात सुरु झालेले राजकारण नवे रंग दाखवत आहे. होळी आणि धुळवडीला दोन महिने बाकी असताना राज्यात मात्र आतापासून राजकीय धुळवड सुरु झाली आहे. डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण! हेच तुमचे भविष्य!....असे भाजप नेत्यांना 'सामना'च्या अग्रलेखातून सुनावणाऱ्या संजय राऊतांवर भाजप नेते आशिष शेलार यांनी 'चला हवा येऊ द्या,' असे सांगत पलटवार केला आहे.

काँग्रेसने कधीकाळी चुकीचे वर्तन केले म्हणून आम्हालाही अंगास शेण फासण्याचा व शेण खाऊन थयथयाट करण्याचा अधिकार आहे असेच भाजपचे लोक म्हणतात. मग हा शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेने दिला? असा सवाल करत शिवसेना खासदार व 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण! हेच तुमचे भविष्य! असे राऊत यांनी म्हटले आहे.

राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, माजी भाजप नेते एकनाथ खडसे यांना आलेल्या ईडीच्या नोटीशींवरुन राज्यातले राजकारण तापले आहे. त्यामुळे संतापलेल्या राऊत यांनी विशेषतः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर शरसंधान केले आहे. ''महाराष्ट्रात ‘ईडी’ प्रकरण गाजत आहे. महाराष्ट्रातून भाजपची इडा-पीडा गेल्यापासून हे ‘ईडी’ प्रकरण जोर धरू लागले आहे. म्हणजे ईडीचा वापर करून भाजपविरोधकांना नमविण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत, असा आरोप राऊत यांनी केला आहे.

एक मात्र खरे, महाराष्ट्रातील भाजपवाले सत्ता स्थापनेसाठी त्या ईडीवर फारच विसंबून राहिले आहेत. ईडीच्या वतीने भाजप कार्यालयात हजारेक नोटिसा जणू छापूनच ठेवल्या आहेत व कोणी सत्य बोलू लागले की, त्याच्या नावावर ती नोटीस पाठवून द्यायची, असा एक जोडधंदा सध्या सुरू आहे, अशीही टीका राऊत यांनी केली आहे. 

त्यावर, "प्रभादेवीच्या गल्लीत बसून वर्षानुवर्षे दुसऱ्यांच्या टोप्या बेमालूमपणे उडवणारे आता एवढी का तणतण करत आहेत? निर्दोष असल्याचा कांगावा का करावा लागतोय? गाव का गोळा करावा लागतोय? ज्यांनी खादाडासारखे खाल्ले, त्यांनाच अपचन झालेय,तेच फुसकी हवा सोडून दुर्गंधी करत आहेत. चला हवा येऊ द्या!'' असे प्रत्युत्तर शेलार यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिले आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख