भिवंडीच्या आयुक्तांची धडक कारवाई : तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने कोविड रुग्णालयाची मान्यता रद्द  - Bhiwandi Commissioner's action: Recognition of Kovid Hospital canceled due to lack of expert doctors | Politics Marathi News - Sarkarnama

भिवंडीच्या आयुक्तांची धडक कारवाई : तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने कोविड रुग्णालयाची मान्यता रद्द 

शरद भसाळे 
रविवार, 26 जुलै 2020

तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव, रुग्णांना मिळणारे उपचार व अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांचे मृत्यू होत आहेत. ही गंभीर बाब लक्षात येताच भिवंडी महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज आशिया या शहरातील कामतघर परिसरातील वरालादेवी हॉस्पिटलला कोविड रुग्णालय म्हणून देण्यात आलेली मान्यता आज (ता. २६ जुलै) दुपारी तातडीने रद्द करून नवीन रुग्ण नोंदणीस स्थगिती दिली आहे. 

भिवंडी : भिवंडी शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत, यासाठी काही खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून मान्यता देण्यात आली आहे. मात्र, या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव, रुग्णांना मिळणारे उपचार व अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांचे मृत्यू होत आहेत. ही गंभीर बाब लक्षात येताच भिवंडी महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज आशिया या शहरातील कामतघर परिसरातील वरालादेवी हॉस्पिटलला कोविड रुग्णालय म्हणून देण्यात आलेली मान्यता आज (ता. २६ जुलै) दुपारी तातडीने रद्द करून नवीन रुग्ण नोंदणीस स्थगिती दिली आहे. 

आयुक्त आशिया यांच्या या धाडसी कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. भिवंडीतील कोविड हॉस्पिटलवर लक्ष ठेवणे, त्याची तपासणी व चौकशी करण्याकरीत टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. 

भिवंडी शहर परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे शहरातील विविध भागात असलेल्या काही हाँस्पिटलला कोविड रूग्णालय म्हणून मान्यता दिली आहे. शासकीय नियमानुसार रुग्णांना उपचार व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी या रुग्णालयांना दिले आहेत. या रुग्णालयांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक नेमले आहे. 

शहरातील कामतघर भागातील वरालादेवी हॉस्पिटलमध्ये सुविधा व तज्ज्ञ डॉक्टराचा अभावामुळे रूग्णांचे मृत्यू होत असल्याची तक्रार आयुक्त डॉ. आशिया यांच्याकडे येताच त्यांनी पथकाव्दारे तपासणी केली. त्या वेळी वरालादेवी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याचे दिसले. तसेच, रुग्णालयात फिजिशियनसुद्धा उपलब्ध नसल्याचे टास्क फोर्स व आयुक्त्यांच्या निदर्शनास आले. ही गंभीर बाब लक्षात घेऊन तूर्तास या रुग्णालयाला कोणते नवे रुग्ण दाखल करून घेण्यास मनाई करण्यात आली. 

टास्क फोर्सच्या बैठकीत आयुक्त डॉ. आशिया यांना वरालादेवी हॉस्पिटलमध्ये या जुलै महिन्यात मृत्यू दर जास्त झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आयुक्त डॉ.आशिया यांनी रुग्णालयात नवीन रुग्ण दाखल करून घेण्यास मनाई आदेश दिले. तसेच, सध्या असलेले रुग्ण तातडीने इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्याची सूचना मुख्य वैद्यकीय अधिकारी यांना देत हॉस्पिटलची कोविड रुग्णालयाची मान्यता रद्द करण्याचे आदेश आजच दिले. 

कोविड बाधित रुग्णांवर आयसीएमआर आणि सरकारच्या आदेशानुसार समाधानकारक औषधोपचार होणे आवश्यक आहे. पण, संबंधित रुग्णालयात सरकारच्या व आयसीएमआरच्या निकषानुसार कोविड रुग्णांवर उपचार होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, या रुग्णालयातील मृत्यूदरही जास्त असल्याने या रुग्णालयास नोटीस देऊन खुलासा मागविण्यात आला आहे. या रुग्णालयावर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन मोकाशी यांनी दिली. 

Edited By Vijay Dudhale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख