भास्करराव माझ्यासारखे तापट असूनही शांत होते : अजित पवार - Bhaskarrao Jadhav was calm despite being angry like me : Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

भास्करराव माझ्यासारखे तापट असूनही शांत होते : अजित पवार

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 6 जुलै 2021

विधानसभेत काल जे घडले ते अशोभनीय असेच होते.

मुंबई : आम्ही अनेक मुख्यमंत्र्यांना विधानसभेच्या सभागृहात पाहिले आहे. राज्यात विधीमंडळाचे पावित्र्य नेहमीच राखले गेले आहे. पण, सोमवारी (ता. ५ जुलै) विधानसभेत जी गोष्ट घडली आहे, ती अशोभनीय होती. भाजपच्या आमदारांकडून चुका झालेल्या आहेत. भास्करराव जाधव माझ्यासारखे तापट असूनही शांत होते. शांततेने ते वागत होते, शिवसैनिक असून ते शांत होते, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचे समर्थन केले. (Bhaskarrao Jadhav was calm despite being angry like me : Ajit Pawar)

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशनाचे आज सायंकाळी सूप वाजले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. त्यावेळी त्यांनी निलंबनाचे समर्थन केले. अजित पवार म्हणाले की, विधानसभेच्या सभागृहात आम्ही अनेक मुख्यमंत्र्यांना पाहिले आहे. सभागृहाचे नेहमी या राज्यात पावित्र्य राखले गेले आहे. विधानसभेत काल जे घडले ते अशोभनीय असेच होते. पण, काल विरोधी पक्षाचा तोल का गेला, हे कळलं नाही. भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांकडून चुका झालेल्या आहेत. हे मान्यच करावे लागेल.  त्यानंतर विधानसभा उपाध्यक्षांच्या चेंबरमध्ये जे काही घडलं, ते भास्करराव जाधव यांनी सर्व काही विधानसभेच्या सभागृहात सांगितले. भास्करराव माझ्यासारखे तापट असूनही शांत होते. शांततेने ते वागत होते. शिवसैनिक असून ते शांत होते.

हेही वाचा : शिवसेना आणि भाजप एकत्र येणार का, या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचे रोखठोक उत्तर

विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना आर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले. त्याच्या निषेधार्थ आज (ता. ६ जुलै) भाजपने सुरुवातीला विधानसभा सभागृहाच्या पायऱ्यांवर अधिवेशन भरवले. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले, चुका करूनही आज भाजपने विधिमंडळाच्या आवारात प्रति विधानसभा भरवली. त्यातून  विरोधी पक्षाने लोकशाहीच्या पवित्र मंदिराचा अपमान केला आहे. संसद आणि विधानसभेत बेलगाम असणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. याचीही आठवण अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना करून दिली. 

राज्य लोकसेवा आयोगाच्या रिक्त जागांबाबत अजित पवार म्हणाले की, राज्यात एमपीएससीला स्वायत्तता देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी काल रिक्त पदे भरण्याचा आदेश दिला. त्यानंतर झालेल्या बैठकाला अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. त्या बैठकीत आम्ही नोट तयार केली आहे. त्यामध्ये यूपीएससीच्या धर्तीवर काम करण्याचे ठरले आहे. राज्य लोकसेवा परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढविण्याचा आदेशही मुख्यमंत्र्यांनी काल दिला आहे. त्यानुसार ती वयोमर्यादा आता ४३ वर्षे असणार आहे. येत्या काळात आपण राज्यात सुमारे १५५११ रिक्त जागा भरणार आहोत, असेही पवार यांनी नमूद केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख