सीमाप्रश्वावर बोलण्यास महाराष्ट्रातील नेत्यांवर बंदी घाला : काँग्रेस प्रभारी बरळले - Ban leaders in Maharashtra from speaking on border issue says h k patil | Politics Marathi News - Sarkarnama

सीमाप्रश्वावर बोलण्यास महाराष्ट्रातील नेत्यांवर बंदी घाला : काँग्रेस प्रभारी बरळले

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंसह सर्व नेत्यांवर बेळगाव सीमाप्रश्नावर बोलण्यावर निर्बंध आणण्याची अजब मागणी एच. के. पाटील यांनी केली आहे. 

बेळगाव : बेळगाव सीमाप्रश्नावरून दोन्ही राज्यांतील नेत्यांमध्ये सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनीही महाराष्ट्रविरोधी भूमिका घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंसह सर्व नेत्यांवर बेळगाव सीमाप्रश्नावर बोलण्यावर निर्बंध आणण्याची अजब मागणी त्यांनी केली आहे. 

मागील काही दिवसांपासून बेळगाव सीमाप्रश्नावरून कर्नाटकातील मंत्र्यांची बेताल वक्तव्य सुरू आहेत. बेळगावच्या बदल्यात मुंबई देण्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केले होते. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वच नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्र नेत्यांनी सीमाप्रश्‍नी आक्रमक भुमिका घेतल्याने कर्नाटक नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 

कर्नाटकातील कॉंग्रेसचे नेते व महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी आता त्यात भऱ घातली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रातील नेत्यांनी कन्नड भाषा आणि कर्नाटक विरोधामध्ये कोणत्याही स्वरुपाचे भाष्य करू नये, या आशयाच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात निर्बंध प्रतिज्ञापत्र दाखल करायला हवे.

सीमाप्रश्‍न सल्लागार ऍड. रविंद्र तोटीगार यांनी नुकतीच पाटील यांची बंगळूर येथे भेट घेतली. या भेटीमध्ये सीमाप्रश्नावर चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी निर्बंध प्रतिज्ञापत्राबाबत कर्नाटक सरकारला सुचविले असल्याचे सांगितले. पाटील हे सिध्दरामय्या सरकारच्या काळात ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री होते. तसेच कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्‍न समन्वय मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. तर सध्या ते महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत.

काँग्रेस प्रभारींनीच वादग्रस्त वक्तव्य केल्याने महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. पाटील यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्रातील नेत्यांकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटू शकतात. राज्यातील काँग्रेस नेत्यांनाही त्याला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख