मंत्रीपदाची संधी नाकारणारा नेता हरपला : पटेल यांना थोरात यांची आदरांजली - Balasaheb Thorat Pays Tribute to Ahmed Patel | Politics Marathi News - Sarkarnama

मंत्रीपदाची संधी नाकारणारा नेता हरपला : पटेल यांना थोरात यांची आदरांजली

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खा. अहमद पटेल यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःख असून काँग्रेस पक्षाने समर्पित, अनुभवी, निष्ठावंत, कुशल संघटक आणि रणनितीकार गमावले आहेत, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत

मुंबई : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खा. अहमद पटेल यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःख असून काँग्रेस पक्षाने समर्पित, अनुभवी, निष्ठावंत, कुशल संघटक आणि रणनितीकार गमावले आहेत, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.

अहमद पटेल यांच्या निधनावर दुःख व्यक्त करून ते म्हणाले, "वयाच्या २६ व्या वर्षी अहमद पटेल यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. राजकीय पेचप्रसंगावेळी कौशल्याने तोडगा काढणारे उत्तम रणनितीकार म्हणून त्यांची ओळख होती. ते तीन वेळा लोकसभा सदस्य व पाच वेळा राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून गेले. अनेकवेळा मंत्रीपदाची संधी असताना त्यांनी ती न स्वीकारता निरपेक्ष भावनेने पक्ष संघटनेत काम केले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे संसदीय सचिव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष अशा विविध पदांवर कार्यरत असताना त्यांनी काँग्रेस पक्ष संघटना मजबूतीसाठी मोठे योदगान दिले आहे."   

"कायम स्पष्ट राजकीय भूमिका घेण्यासाठी ते ओळखले जायचे. आपल्या भूमिकांशी ठाम राहणे, पक्षहित सर्वात प्रथम ठेवणे, देशभरातल्या नेत्यांशी सुसंवाद या त्यांच्या कामाच्या खास बाबी होत्या. काँग्रेससाठी अहमद पटेल हे कायम निरपेक्ष सैनिकाच्या रुपात सज्ज असायचे. महाराष्ट्रातही विद्यमान महाविकास आघाडीचे सरकार बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आणि मार्गदर्शन होते," असेही थोरात म्हणाले. 

''गेल्या अनेक वर्षापासून पक्षाच्या कामानिमित्ताने पटेल यांच्याशी गाठीभेटी व चर्चा होत असत. माझे त्यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाची व वैयक्तिक माझी कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. अहमद पटेल यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पटेल कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे,'' असे थोरात म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख