मुख्यमंत्रीसाहेब स्वतःच्या लोकांना नियम शिकवा....

कोरोना योध्यांचे लसीकरण शिल्लक असताना बेकायदेशीरपणे लस घेतल्याप्रकरणी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के व आमदार रवींद्र फाटक यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
Atul Bhatkhalkar - Uddhav Thackeray
Atul Bhatkhalkar - Uddhav Thackeray

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी राज्याला उपदेशाचे डोस देण्यापेक्षा आपल्या पक्षातील संजय राठोड, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आदी नेत्यांना कोरोना प्रतिबंधाचे नियम शिकवावेत, असा टोला भारतीय जनता पक्षाचे नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. 

कोरोना योध्यांचे लसीकरण शिल्लक असताना बेकायदेशीरपणे लस घेतल्याप्रकरणी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के व आमदार रवींद्र फाटक यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार रवींद्र फाटक, ठाणे महानगरपालिकेचे काही नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी नियमांच्या बाहेर जाऊन कोरोनाची लस टोचून घेतली आहे. हे अत्यंत संतापजनक असून पूर्णत: बेकायदेशीर आहे. यातून शिवसेनेची स्वार्थी मानसिकता दिसते, अशी घणाघाती टीकाही भातखळकर यांनी केली आहे.

ते म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचे नियम पाळण्यासाठी संपूर्ण राज्याला उपदेशाचे डोस पाजल्याच्या दुसऱ्याच दिवशी  वनमंत्री संजय राठोड यांनी दहा हजारांपेक्षा जास्त लोक जमवून कोरोनाला खुले निमंत्रण दिले. तर दुसरीकडे कोरोना योद्धयांचे लसीकरण अद्याप पूर्ण झाले नसताना, तसेच वरिष्ठ नागरिक, बालक यांना अगोदर लस देण्याची आवश्यकता असताना सुद्धा ठाण्यात शिवसेनेच्या नेत्यांनी स्वतःचे लसीकरण करून घेतले आहे,''

"देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असूनसुद्धा कोरोनाविरोधातील लसीकरण कार्यक्रमात महाराष्ट्र मागे का आहे हेच यातून स्पष्ट होते. यातही धक्कादायक बाब म्हणजे ज्या पोहरादेवी येथे संजय राठोड यांनी निर्लज्जपणे शक्तीप्रदर्शन केले त्या पोहरादेवीच्या महतांनाच आता कोरोना झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्याला उपदेशाचे डोस देण्यापेक्षा आपल्या पक्षातील नेत्यांना कोरोनाचे नियम शिकवावे,'' असा टोलाही भातखळकर यांनी लगावला.

कायम दातखिळी बसल्यासारखे गप्प बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी याविषयी त्यांचे काय मत आहे याचा सुद्धा खुलासा करावा अशीही मागणी भातखळकर यांनी केली आहे. राठोड, म्हस्के, फाटक आदींविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करावा, अन्यथा भारतीय जनता पक्ष आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com