शिवसेनेच्या 'सेक्युलॅरिझम' पुढे ओवेसीही लाजतील : अतुल भातखळकर - Atul Bhatkhalkar Criticism on Shivsena over Aajan Competition | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेच्या 'सेक्युलॅरिझम' पुढे ओवेसीही लाजतील : अतुल भातखळकर

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

ओवेसींनाही लाज वाटेल एवढी शिवसेनेचे लोक सेक्युलर बनलेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व त्यांनी केव्हाच सोडलं होतं. आता साधं हिंदुत्वसुद्धा शिवसेनेला मान्य नाहीये. अल्पसंख्याकांच्या मतांसाठी त्यांचे लांगूलचालन करण्याचा शिवसेनचा हा निंदनीय प्रयत्न आहे, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे

मुंबई : "शिवसेनेने अजानच्या स्पर्धा जाहीर करणे म्हणजे त्यांनी भगवा तर उतरवलेलाच आहे, हिरवा खांद्यावर घेण्यासारखे आहे. शिवसेनेला आता अजान फार गोड वाटू लागली आहे. ओवेसींनाही लाज वाटेल एवढी शिवसेनेचे लोक सेक्युलर बनलेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व त्यांनी केव्हाच सोडलं होतं. आता साधं हिंदुत्वसुद्धा शिवसेनेला मान्य नाहीये. अल्पसंख्याकांच्या मतांसाठी त्यांचे लांगूलचालन करण्याचा शिवसेनचा हा निंदनीय प्रयत्न आहे.", अशी टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

दक्षिण मुंबईत शिवसेनेकडून अजान स्पर्धेचं आयोजन केल्यामुळे, नवा वाद निर्माण झालाय. हिंदूत्ववादी  शिवसेना आता मुस्लिम धर्मियांसाठी अजान स्पर्धेचं आयोजन करून मुस्लिम मतांकडे वळलीय का..? असा सवाल विरोधकांकडून विचारला जातोय. दक्षिण मुंबईचे शिवसेना विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी या स्पर्धेचं आयोजन शिवसेनेनं केलं नसून फाऊंडेशन फाँर यू या संस्थेनं केल्याचा खुलासा केला आहे. शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ यांनी अजानच्या ऑनलाइन स्पर्धेबाबत केलेल्या  वक्तव्याचा निषेध भाजपकडून केला जात आहे, शिवसेनेचे बदलते स्वरूप दिसत असल्याची टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.  तर शिवसेनेच्या  मूळ आचार विचाराला सत्तेसाठी तिलांजली दिल्याचेही ते म्हणाले. 

दुसरीकडे सकपाळ यांनी याबाबत खुलासा केला आहे. "शिवसेना प्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा म्हटले होते की आम्हाला प्रत्येक धर्म प्यारा आहे. परंतु, प्रत्येकाकडे राष्ट्रीयत्न असायला पाहिजे. जे मुस्लिम राष्ट्रीयत्व मानतात, भारताला मानतात ते मुस्लिम आमचे आहेत. मग ते अब्दुल कलाम असतील, सय्यद किरमाणी असतील. साहेबांनी एका जोडप्याला मातोश्रीवर नमाज पढायला परवानगी दिली होती. शेवटी मानवता हाच धर्म आहे. त्याचे पालन करत जाऊ,'' असे ते म्हणाले. 

''दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे मुस्लिम पदाधिकारी आले होते. आमची मुले घरात बसत नाहीत, खाली जातात, त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यावेळी मी त्यांना सुचवले की जशी आम्ही भगवद्गगीतेची स्पर्धा घेतो तशी तुम्ही तुमच्या भागात अजानची आॅनलाईन स्पर्धा घेतलीत, तर मुलं घरी बसून त्या स्पर्धेत भाग घेतील. जेणेकरुन त्यांचे बाहेर वावरणे कमी होईल, या हेतूने मी त्यांना तशी शिफारस केली  होती. राजकारण करणाऱ्यांना ते करायचेच असले. कारण हिंदू-मुस्लिम मुद्द्यावरुन राजकारण करण्याची त्यांची पहिल्यापासूनची सवय आहे. माझा उद्देश अतिशय स्वच्छ होता. त्यांच्यामध्ये त्यांच्या घरी राहून स्पर्धा व्हावी, हा माझा हेतू होता,'' असेही सकपाळ यांनी माध्यमांना सांगितले.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख