Ashish Shelar's criticism of the government led by Ashish Shelar | Sarkarnama

सगळाच तीन तिघाडा आणि काम बिघाडा, आशिष शेलारांची आघाडी सरकारवर बोचरी टीका 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 4 जुलै 2020

आपल्या ट्विटमध्ये शेलार म्हणतात, की आघाडी सरकारमध्ये कुरकुर आहे. मतभेद आहेत. या गदारोळात सरकारला विद्यार्थ्यांचा विसर पडू नये म्हणून हे स्मरण! 

पुणे : तीन पक्षाचं सरकार... खाटांची... रोज कुरकुर...समजूत काढायला रोज धावपळ...एक बाजू झाकली की दुसरंच काहीतरी उघडं पडत..सगळाच तीन तिघाडा आणि काम बिघाडा.. अशी बोचरी टीका भाजपचे नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. 

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात काल मुंबईत बैठक पार पडली होती. कोरोनासंदर्भात सरकारने जे काही निर्णय घेतले आहेत त्याबाबत या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.

तर तातडीने ठाकरे सरकारने दोन किलोमीटरची अट रद्द केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शेलार यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य करणारे ट्विट केले आहे. 

आपल्या ट्विटमध्ये शेलार म्हणतात, की आघाडी सरकारमध्ये कुरकुर आहे. मतभेद आहेत. या गदारोळात सरकारला विद्यार्थ्यांचा विसर पडू नये म्हणून हे स्मरण! 

आमच्या एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचा निर्णय अजून बाकी आहे !! घराबाहेर न पडणारे पालकमंत्री, बेजबाबदार प्रशासन, आणि मुंबई महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांचा चेहरा या आरशात दिसतोय का पहा ? 

मुंबई सारख्या शहरात अशा घटना रोज कुठेना कुठे घडत आहेत. सरकार आणि प्रशासनाच्या मानवी संवेदनाचाही "लॉकडाऊन" झालाय की काय ? 
कोरोनाने मृत्यू झालेल्या आपल्या आईचा मृतदेह 21 वर्षीय मुलाला पीपीई किट न देता शताब्दी रुग्णालयाने गुंडाळण्यास सांगितले.

त्याच्याच मित्राला बोलावून स्ट्रेचर उचलायला लावले...ही संतापजनक, अमानवी, असंवेदनशील घटना उघड करुन या महापालिकेसमोर वर्तमानपत्राने आरसाच धरलांय! असा हल्लाबोलही शेलार यांनी केला आहे. ठाकरे सरकारविरोधात भाजप आक्रमक झालेला दिसून येत आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख