Ashish Shelar criticizes Sachin Sawant | Sarkarnama

सचिन सावंत, तुम्ही आता उठाबशा काढा ः आशिष शेलार 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 23 मे 2020

मशीनच्या मदतीने तुम्ही कितीही ट्विट केले तरी "महाराष्ट्र बचाओ' हेच दिवसभर ट्विटरवर क्रमांक एकवर ट्रेण्डींग होते. उगाच तुमच्या इंटरनेट निरक्षरतेचे लाजिरवाणे दर्शन का घडवताय

पुणे : कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपच्या आंदोलनावर केलेल्या टीकेला भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की "मशीनच्या मदतीने तुम्ही कितीही ट्विट केले तरी "महाराष्ट्र बचाओ' हेच दिवसभर ट्विटरवर क्रमांक एकवर ट्रेण्डींग होते. उगाच तुमच्या इंटरनेट निरक्षरतेचे लाजिरवाणे दर्शन का घडवताय?' असा प्रश्न करीत सावंत यांचा समाचार घेतला. 

सचिन सावंत यांनी शुक्रवारी टीका करताना, "महाराष्ट्र कोरोना महामारीच्या संकटाशी लढत असताना सत्तेकरिता हपापलेल्या भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्राचे राजकीय रणांगण करण्याचा प्रयत्न राज्यातील सूज्ञ जनतेने हाणून पाडला आहे.

महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे सुरू केलेल्या # महाराष्ट्रद्रोहीBJP या ट्‌विटर ट्रेंडला उस्फूर्त प्रतिसाद देऊन भाजपचा "महाराष्ट्रद्रोही' चेहरा उघडा पाडला आहे, अशा शब्दांत आंदोलनाची खिल्ली उडवली होती. 

ही टीका भाजप कार्यकर्त्याच्या जिव्हारी लागली होती. त्यामुळे शेलार यांनी सावंत यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. चोवीस तास खोटे बोलणारे आज उताणे पडले.."महाराष्ट्र बचाव' ला ट्विटवर काय प्रतिसाद मिळाला, याचा हा घ्या पुरावा...! खोटारडे सावंत तुम्ही, आता कान धरून उठाबशा काढा आणि तातडीने प्रेसनोट मागे घ्या! अशी मागणी शेलार यांनी सावंत यांच्याकडे केली.  

 

भाजपचा "महाराष्ट्रद्रोही' चेहरा उघडा पडला :  सचिन सावंत 

मुंबई : महाराष्ट्र कोरोना महामारीच्या संकटाशी लढत असताना सत्तेकरिता हपापलेल्या भाजपचा महाराष्ट्राचे राजकीय रणांगण करण्याचा प्रयत्न राज्यातील सूज्ञ जनतेने हाणून पाडला आहे. महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे सुरू केलेल्या # महाराष्ट्रद्रोहीBJP या ट्‌विटर ट्रेंडला उस्फूर्त प्रतिसाद देऊन भाजपचा "महाराष्ट्रद्रोही' चेहरा उघडा पडला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. 

सावंत म्हणाले, महाराष्ट्रात कोरोनाऐवजी सरकारला शत्रू समजणाऱ्या भाजप नेत्यांनी "महाराष्ट्र बचाओ' नावाचे आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनाकडे जनतेसोबतच भाजप कार्यकर्त्यांनीही पाठ फिरवली. 

महाराष्ट्र भाजपतर्फे सरकारच्या प्रयत्नांवरती आक्षेप घेतला जात आहे. सरकार वैज्ञानिक दृष्टीकोनातून कोरोनावर मात करण्याकरिता प्रयत्न करत आहे, हे भाजप नेत्यांच्या पचनी पडत नसावे. टाळ्या, थाळ्या वाजवून, दिवे लावून किंवा दोरीच्या उड्या आणि बेडूक उड्या मारून कोरोना पळून गेला असता, अशी भाजप नेत्यांची अपेक्षा असावी, असा टोला सावंत यांनी लगावला. 

शुक्रवारी सकाळपासून 1 लाख 25 हजारांपेक्षा अधिक ट्‌विट # महाराष्ट्रद्रोहीBJP हा हॅशटॅग वापरून करण्यात आले. देशपातळीवरील आयटी सेलचे कार्यकर्ते, पेड ट्रोल आणि बॉट्‌स वापरून देखील भाजपच्या इंग्रजीमधील महाराष्ट्र बचाओ आंदोलनाला जनतेचा प्रतिसाद मिळाला नाही. आपल्या पेड ट्रोल आर्मीकडून "महाराष्ट्र बचाओ' हा हॅशटॅग ट्रेंड करण्याचा प्रयत्नही महाराष्ट्रद्रोहच आहे, असे सावंत म्हणाले.

 

संकट काळातही गलिच्छ राजकारण करणाऱ्या भाजपच्या सत्तापिपासू वृत्तीला उघडे पाडल्याबद्दल सावंत यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख