अर्णब गोस्वामींना अलिबाग न्यायालयात हजर करणार - Arnab Goswami To be produced in Alibaug Court today | Politics Marathi News - Sarkarnama

अर्णब गोस्वामींना अलिबाग न्यायालयात हजर करणार

दिनेश पिसाट
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

अलिबाग तालुक्यातील कावीर गावातील अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांनी  मे २०१८ रोजी आपल्या राहत्या घरात आत्महत्या घेतल्याची घटना घडली होती. आता या प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना एलसीबी अलिबागने आज मुंबई येथून त्यांच्या राहत्या घरातून अटक केली आहे, त्यांना अलिबाग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

अलिबाग  : अलिबाग तालुक्यातील कावीर गावातील अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांनी  मे २०१८ रोजी आपल्या राहत्या घरात आत्महत्या घेतल्याची घटना घडली होती. आता या प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना एलसीबी अलिबागने आज मुंबई येथून त्यांच्या राहत्या घरातून अटक केली आहे, त्यांना अलिबाग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

आई पुत्राची ही आत्महत्या संशयास्पद वाटत असल्याने अलिबाग पोलिस स्टेशनला गुन्हाची नोंद सुध्दा करण्यात आली. या प्रकरणात योग्य तपास झाला नसून या प्रकरणाचा फेरतपास व्हावा, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदन देवून अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी केली होती. त्यानुसार या संपुर्ण प्रकरणाची चौकशी ही राज्य गुन्हे अन्वेषण विभागा (सी.आय.डी) कडे देवून फेरतपास करण्यात येणार असल्याची माहीती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. 

अलिबाग तालुक्यातील कावीर या गावात अनव्य नाईक याचे वडिलोपार्जित घर आहे. या घरात अनव्य नाईक याची आई कुमुद नाईक आणि अनव्य नाईक राहत होते. अनव्य नाईक यांचा  मुंबई येथे घर सजावटीचा व्यवसाय होता. या व्यवसायात उधारी वसूल न झाल्याने नाईक यांच्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. त्यामुळे घेणेकरी यांनी पैशाचा तगादा लावला होता. याला कंटाळून ५ मे २०१८ रोजी आपल्या घरी गळफास घेऊन आई आणि मुलाने आत्महत्या केली. 

त्यावेळी मृत्यूपूर्वी नाईक यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या नोट मध्ये रिपब्लीक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा याची नावे टाकली होती. त्यामुळे या प्रकरणाला वेगळी कलाटणी आली होती. 

अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणाचा तपास हा अलिबाग पोलिसांनी केला होता. या प्रकरणात अलिबाग पोलिस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. या तक्रारीमध्ये अन्वय नाईक यांच्या मुलीने अर्णव गोस्वामी यांनी त्यांच्या वडिलांच्या कामाचे पैसे न दिल्याने त्यांचे वडील व आजीने आत्महत्या केल्याचे म्हटले होते. 

दरम्यान करण्यात आलेल्या तपासापासून आपण असमाधानी असल्याने गुन्हेगारी प्रक्रिया संहीता (सि.आर.पी.सी) मधील कलम १७३ (८) मधील अधिकाराचा वापर करुन हे प्रकरण राज्य अन्वेषण विभाग अथवा गुन्हे शाखेकडे वर्ग करावे. तसेच तत्कालीन संबंधित तपास अधिकारी व इतर शासकीय अधिकारी, न्यायीक अधिकारी यांचे विरुध्द चौकशी करण्यात यावी, अशी विनंती अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी गुहमंत्री अनिल देशमुख यांना दिलेल्या निवेदनातून केली होती.

त्यानुसार आज मुंबई पोलीस आणि रायगड एलसीबी यांनी अर्णव गोस्वामी यांना अटक करून आता अलिबाग येथे आणणार आहेत. त्यानंतर त्यांना अलिबाग जिल्हा न्यायलायत हजर करतील अशी माहिती एलसीबी पोलीस निरीक्षक जमाल शेख यांनी दिली आहे.

या संदर्भात शासनाने मंगळवार दि. २६ मे ला निर्णय घेवून अलिबाग पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्ह्याचा फेरतपास गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्याबाबत पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई व अपर पोलिस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांना आदेश देण्यात आले असून या संपुर्ण प्रकरणाचा फेरतपास होणार असल्याची माहीती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख