नितीन राऊत यांनी केलेल्या नियुक्त्या रद्द होणार - Appointments By Nitin Raut will be Cancelled Say Balasaheb Thorat | Politics Marathi News - Sarkarnama

नितीन राऊत यांनी केलेल्या नियुक्त्या रद्द होणार

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 23 जुलै 2020

राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडातील नाराजी नाट्य अधूनमधून डोके वर काढते. आता पुन्हा एकदा काँग्रेसची नाराजी समोर आली आहे. या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी नाराज आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती

मुंबई : महामंडळाच वाटप अजूनही प्रलंबित असताना ऊर्जा खात्यातील संबंधित पारेषण, निर्मिती या कंपन्यांमधील संचालक मंडळावर अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात आली. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी या नेमणुका केल्या आहेत. पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेने या नेमणुकांना विरोध केला आहे. दरम्यान, या नियुक्त्या रद्द करण्यात येतील असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सूचीत केले आहे.

राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडातील नाराजी नाट्य अधूनमधून डोके वर काढते. आता पुन्हा एकदा काँग्रेसची नाराजी समोर आली आहे. या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी नाराज आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. नाना पटोले, नितीन राऊत, सुनील केदार आदी या बैठकीस उपस्थित होते. महाआघाडीचे सरकार असताना काँग्रेसला मात्र निर्णय घेता येत नाहीत असा आक्षेप काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी नोंदवला होता. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनीही नाराजी व्यक्त केली होती. या नेत्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची बैठक घेऊन आपल्या भावनाही व्यक्त केल्या होत्या. मुख्यमंत्री कार्यालयाकडून केल्या जाणाऱ्या बदल्यांवरही काँग्रेस नेत्यांचे आक्षेप होते. 

आता पुन्हा एकदा काँग्रेस आमदारांची कामे रखडवली जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या मंत्र्यांनी केलेल्या नियुक्तांवरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेते नाराज झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे आमदार यांच्यात दोन दिवसांपूर्वी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली होती. या दरम्यान काही आमदारांनी याबाबत तक्रार केली होती. 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आमदारांची कामे होत नाहीत. तसेच मान राखला जात नसल्याची तक्रार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली.  आहे. आमची कामे होणार नसतील तर आम्ही लोकांना तोंड कसे देणार, असा प्रश्नही त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला होता. तसेच एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याकडून काम रोखले गेल्याचा आरोपही धोटे यांनी केला होता. 

दरम्यान, काँग्रेस नेत्यांच्या झालेल्या बैठकीबाबत बाळासाहेब थोरात यांनी खुलासा केला. काँग्रेसचे मंत्री काल मला भेटले होते. त्यांचे काही प्रश्न होते. त्यावर आमच्यात चर्चा झाली. कुणी नाराजी व्यक्त केली नाही. आम्ही नेहमी भेटतो, काळजी घ्यावी लागते, असे थोरात यांनी सांगितले.  

नितीन राऊत यांनी ज्या अशासकीय नियुक्ती केल्या त्यानंतर त्याबाबत फेरविचार करावा लागेल व त्या रद्द करण्यात येतील, असे त्यांनी सूचीत केले. साखर उद्योगाबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख