Any entrepreneur surveys the market before investing anywhere. There is also agriculture: Uddhav Thackeray | Sarkarnama

कोणताही उद्योजक कुठेही गुंतवणूक करताना आधी मार्केट सर्व्हे करतो. तसेच शेतीचेही आहे : उद्धव ठाकरे

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 21 जुलै 2020

विद्यापीठाचे संशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर नेण्यासह, जे विकेल ते पिकेल ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विद्यापीठांनी विविध वाणांचे संशोधन करताना शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या लहान यंत्रांचे संशोधन करून ते शेतकऱ्यांना उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 
- दादा भुसे, कृषिमंत्री.

मुंबई : शेती आणि शेतमालासाठीही गोल्डन अवर महत्त्वाचा आहे. वेळेत शेतमालाची खरेदी आणि विक्री होणे गरजेचे आहे. नसता वाढीव किमतीचा लाभ शेतकऱ्यांना न मिळता व्यापाऱ्यांना मिळतो. शेतीला उद्योगाचा दर्जा मिळायला हवा. . शेतीतही मार्केट सर्व्हे अत्यंत गरजेचा असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले

राज्याची ओळख निर्माण करणारी पिके कृषी विद्यापीठांनी विकसित करावीत. बाजारपेठेनुसार पीक पद्धतीत बदल करावा. याशिवाय विद्यापीठातील संशोधनांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनातील अनिश्‍चितता संपून त्यांच्या जीवनात बदल झाला पाहिजे, असे  ठाकरे यांनी सांगितले. 

राज्यातील कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंशी दूरचित्रसंवादाद्वारे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. 

राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे चांगले काम करत आहेत, परंतु त्यांच्या कामातून भविष्यात शेती आणि शेतकऱ्याला आणखी पुढे कसे नेता येईल याचा मार्ग दिसला पाहिजे. शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनातील अनिश्‍चितता संपवण्याची गरज आहे. संघटित शेती आणि संघटित शेतकरी ही संकल्पना राबवून जे विकले जाईल,

तेच पिकवायची गरज असून शेतकऱ्यांना संघटित करताना विभागवार निश्‍चित केलेल्या दर्जाचीच पिके पिकतील, ती बाजारपेठेत विकली जातील. यादृष्टीने शेतकऱ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करावे. अशा उत्पादनांना, शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी त्याचे मार्केटिंग कसे करता येईल याचा विचार व्हावा, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

या वेळी कृषिमंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सल्लागार अजोय मेहता, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजय सावंत, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कुलगुरू डॉ. ए. एस. धवन उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख