Another 4,000 doctors will be available to fight corona | Sarkarnama

कोरोनाविरोधात लढण्यासाठी आणखी चार हजार डॉक्‍टर मिळणार 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 31 मे 2020

महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधून फेब्रुवारी-2019 मध्ये एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेले आणि इंटर्नशिप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सद्यपरिस्थितीत तात्पुरते पदवी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. 

लातूर : महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधून फेब्रुवारी-2019 मध्ये एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेले आणि इंटर्नशिप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सद्यपरिस्थितीत तात्पुरते पदवी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. 

या निर्णयामुळे एमबीबीएस उत्तीर्ण या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी करता येणार आहे. त्यातून सुमारे चार हजार डॉक्‍टर्स सध्याच्या कोविडजन्य परिस्थितीत वैद्यकीय सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. 

इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्या या विद्यार्थ्यांना तातडीने तात्पुरती पदवी प्रमाणपत्रे देण्यात यावीत, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना दिल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी या डॉक्‍टरांच्या सेवा वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत 

नाशिक येथील आरोग्यविज्ञान विद्यापीठामार्फत नोव्हेंबर-2018 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी-2019 मध्ये घोषित करण्यात आला होता. यात सुमारे चार हजार विद्यार्थी एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण झाले होते. या विद्यार्थ्यांची इंटर्नशिप एक मार्च 2019 ते 28 फेब्रुवारी 2020 दरम्यान पूर्ण झाली आहे.

इंटर्नशिप पूर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रदान समारंभाची तारीख अद्याप निश्‍चित करण्यात आलेली नाही. पदवी प्रदान समारंभाची वाट न पाहता या विद्यार्थ्यांना तात्पुरती पदवी प्रमाणपत्रे देण्यात येतील. त्यानंतर हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय सेवेत दाखल होण्यास पात्र ठरणार आहेत. 

सध्याच्या परिस्थितीत कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्‍टरांची कमतरता भासत आहे. या निर्णयामुळे वैद्यकीय सेवेसाठी मोठ्या प्रमाणात डॉक्‍टर्स उपलब्ध होणार असल्याने आरोग्य सेवेवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी म्हटले आहे. 
 

डॉक्‍टर, नर्सेस यांना मानधन तत्वावर  घेणार 

बृहन्मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्‍टर आणि नर्सेस यांची आवश्‍यकता असल्याने त्यांना मानधन तत्वावर कोविड कालावधीसाठी घेण्यात यावे, असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज दिले. 

जे डॉक्‍टर 45 वर्षांपेक्षा कमी आहेत. ज्यांना कुठलाही आजार नाही आणि इंटर्नशिप पूर्ण केली आहे. ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन आहे, अशा डॉक्‍टरांना मानधन तत्त्वावर कोविड कालावधीसाठी गरजेनुसार घेण्यात येणार आहे. या डॉक्‍टरांना दरमहा 80 हजार रुपये मानधन दिले जाईल. डॉक्‍टरांप्रमाणे फिजिशियन यांनाही मानधन तत्वावर घेण्यात येणार आहे. भूलतज्ज्ञ आणि इंटेन्सिविस्ट यांना दरमहा दोन लाख रुपये मानधन देण्यात येणार आहे. 

ही बातमीही वाचा : राज्यात आतापर्यंत कोरोनाचे 28 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले 

बृहन्मुंबईतील नर्सेसची कमतरता भरून काढण्यासाठी त्यांनाही मानधन तत्वावर घेण्यात येणार आहे. ज्यांनी बी. एसस्सी किंवा जी. एन.एम. नर्सिंग कोर्स पूर्ण केला आहे, ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन आहे, त्यांना दरमहा 30 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. डॉक्‍टर आणि नर्सेस यांना हे मानधन बृहन्मुंबई महापालिकेमार्फत देण्यात येणार आहे.

पात्र डॉक्‍टरांनी https://forms.gle/PtCY3SvhvEA43WxV6 या तर, पात्र नर्सेस यांनी https://forms.gle/81LcWWajq1WNQ6cK8 या वेबसाईटवर अर्ज करावेत, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख