सचिन वाझेच्या आरोपावर माझीही चौकशी करा; अजित पवारांचे विरोधकांना खुले आव्हान - Also interrogate me on Sachin Waze's allegations; Ajit Pawar's open challenge to the opposition | Politics Marathi News - Sarkarnama

सचिन वाझेच्या आरोपावर माझीही चौकशी करा; अजित पवारांचे विरोधकांना खुले आव्हान

भारत नागणे
गुरुवार, 8 एप्रिल 2021

माझे वाझेशी कधी संभाषणदेखील झाले नाही.

पंढरपूर :  सचिन वाझे प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचेही नाव या प्रकरणी जोडले गेले आहे. त्यानंतर पंढरपुरात भगिरथ भालके यांच्या प्रचारासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (ता. ८ एप्रिल) वाझे प्रकरणी झालेले आरोप फेटाळून लावत या प्रकरणी माझी  चौकशी करावी, असे खुले आव्हान विरोधकांना दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचारासाठी गुरुवारी पंढरपुरात आले आहेत. आज सकाळी त्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याण काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आढीव येथील काळे यांच्या फार्महाऊसवर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वाझे यांनी पत्रात केलेल्या आरोपप्रकरणी विरोधकांना खुले आव्हान दिले. 

या वेळी पवार म्हणाले, वाझे या व्यक्तीला मी कधीही भेटलो नाही. माझे वाझेशी कधी संभाषणदेखील झाले नाही. त्याने माझ्या नावाचा उल्लेख करण्याच काहीच कारण नाही. माझे याप्रकरणी नाव आल्याने माझी चौकशी करावी. माझ्यावरील हा आरोप धादांत खोटा आहे. सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यात माझीही चौकशी करावी. चौकशीत दूध का दूध पानी का पानी होईल. 

‘‘विरोधकांकडून जाणूनबुजून राज्यातील महाविकास आघाडीचे  सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे,’’ असा आरोपही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी केला.

महाराष्ट्राला जेवढी लस मिळायला पाहिजे, तेवढी लस मिळत नाही. सुरुवातीच्या काळात केंद्राने परदेशात लस पाठवण्याची घाई केली. पण ठिक आहे. ती पण आपलीचं भांवडं आहेत. आपल्या देशात तयार होणारी लसं आपल्या लोकांना आधी मिळायला पाहिजे, ही आमची मागणी आहे. बाहेरच्या देशात लस पाठवण्याऐवजी, आता देशातील राज्यांमध्ये मागणीनुसार लस द्यावी. कालच 350 कोटी लसीचं  वाटप करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्राला 7 लाख 50 हजार लसी मिळाल्या आहेत. ठराविक दिवसांत लसीकरण संपावायचे आहे. यासाठी शासकीय व वैद्यकीय यंत्रणा कामाला लावल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

या वेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, कारखान्याचे अध्यक्ष कल्याण काळे, दीपक साळुंखे, सुरेश घुले, भगिरथ भालके आदी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख