‘एसआरए’तील घर भाड्यावरून जितेंद्र आव्हाडांना सर्वपक्षीयांनी घेरले

मुंबईतील एसआरए पुनर्वसन प्रकल्पात रहिवाशांना आठ ते बारा हजार रुपये भाडे देण्याबाबतच्या गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस, शिवसेना या सहकारी पक्षांसह भारतीय जनता पक्षाने देखील विरोध केला आहे.
All parties oppose Jitendra Awhad over SRA lease
All parties oppose Jitendra Awhad over SRA lease

मुंबई : मुंबईतील एसआरए पुनर्वसन प्रकल्पात रहिवाशांना आठ ते बारा हजार रुपये भाडे देण्याबाबतच्या गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस, शिवसेना या सहकारी पक्षांसह भारतीय जनता पक्षाने देखील विरोध केला आहे. 

एसआरए पुनर्वसन प्रकल्पात मुंबई शहरातील रहिवाशांना बारा हजार रुपये, वांद्रे ते घाटकोपर व अंधेरीपर्यंत दहा हजार रुपये व त्यापुढे आठ हजार रुपये भाडे देण्याचा गृहनिर्माण मंत्र्यांचा प्रस्ताव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बबन कनावजे यांनी आव्हाड यांना पत्र पाठवून या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे.

सध्या मुंबईत झोपडीधारकांना बिल्डर १५ ते १७ हजार रुपये भाडे देतात, त्यामुळे या निर्णयाविरुद्ध लोकांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो. तसेच, रहिवाशांनी घर सोडूनही त्यांचे भाडे थकविणाऱ्या बिल्डरांना समज द्यावी, अशीही विनंती कनावजे यांनी केली आहे. 

अल्पभाड्याचे घर द्यावे 

एसआरएचे हे प्रस्तावित भाडे फारच कमी आहे. त्यात वाढ केली पाहिजे; अन्यथा एवढ्या कमी भाड्यात घर मिळण्यास रहिवाशांना त्रास होईल. प्रत्येक विभागानुसार भाड्याचा अंदाज घ्यावा व विभागवार भाडे निश्चित करावे, असे राज्य काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान म्हणाले. एवढ्या कमी भाड्यात बिल्डरने किंवा सरकारनेच रहिवाशांना त्याच विभागात घर मिळवून द्यावे. तशीही दरवर्षी भाड्यात वाढ होत जाते, त्यामुळे हे भाडे व्यवहार्य असावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार विद्या चव्हाण यांनी व्यक्त केली. 

परिसरातील भाडे तपासावे 

एवढ्या कमी भाड्याऐवजी बिल्डरने किंवा सरकारने रहिवाशांची व्यवस्था संक्रमण शिबिरात करावी. कमी भाडे दिले तर रहिवाशांना अंबरनाथच्या पुढे घरे शोधावी लागतील, असे मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी सांगितले. घर सोडणाऱ्या रहिवाशांना नव्या घरी करावे लागणारे सर्व खर्च बिल्डर देत असलेल्या भाड्यातून निघाले पाहिजेत एवढेतरी भाडे द्यावेच. हल्ली कोरोनामुळे लोकांचे उत्पन्न कमी झाले आहे, त्यामुळे त्यांचे खर्च किती आहेत ते पाहून भाडे ठरवावे. या निर्णयाचा फेरविचार करावा, असे कांदिवली (पू) येथील नगरसेविका श्रीमती अजंटा यादव म्हणाल्या. 

रेडीरेकनरनुसार भाडे द्या 

प्रत्येक उपनगरांत वेगवेगळे भाडे आहे. त्यामुळे सरसकट भाडे न देता परिसरातील दरानुसार भाडे द्यावे. कमी भाड्यात कुलाब्याच्या माणसाला कल्याणला जाण्यावाचून इलाज नाही. त्यामुळे रेडीरेकनरनुसार एसआरएच्या रहिवाशांचे घरभाडे ठरवावे, असे भांडूपचे शिवसेना आमदार रमेश कोरगावकर म्हणाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईतील झोपडीवासियांशी काहीही संबंध नाही, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच याप्रकरणी हस्तक्षेप करून या निर्णयास स्थगिती द्यावी. गरीबांचे कैवारी म्हणवणारे हे सरकार अशा प्रकारे गरीबांची फसवणूक करीत आहे. हा निर्णय मागे घेऊन काहीतरी सुवर्णमध्य काढा, असे घाटकोपरचे भाजप आमदार योगेश सागर म्हणाले. 

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com