दानवेंचे 'ते' विधान पोरकटपणाचे : अजित पवारांचा टोला - Ajit Pawar Criticizes Raosaheb Danve on his statement about Farmers Agitation | Politics Marathi News - Sarkarnama

दानवेंचे 'ते' विधान पोरकटपणाचे : अजित पवारांचा टोला

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

'उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाकिस्तान आणि चीनचा हात आहे,' हे रावसाहेब दानवेंचे विधान पोरकटपणाचे आहे, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे. अशी विधाने लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी केली जात आहेत, असेही पवार म्हणाले. 

मुंबई : 'उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाकिस्तान आणि चीनचा हात आहे,' हे रावसाहेब दानवेंचे विधान पोरकटपणाचे आहे, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे. अशी विधाने लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी केली जात आहेत, असेही पवार म्हणाले. 

दानवे यांच्या विधानाचा अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना समाचार घेतला. ते म्हणाले, "अनेक वर्ष खासदार आणि मुख्य पदावर असणारे दानवे यांचं वक्तव्य योग्य नाही.'जय जवान जय किसान' चा नारा आदराने घेतला जातो. शेतकऱ्या समोर अडचण निर्माण होते तेव्हा तो रस्त्यावर उतरतो. शेतकऱ्यांबाबतजनता आपलेपणाची भावना दाखवते. शेतकरी आंदोलनाशी चीन आणि पाकिस्तानचा काय संबंध? दानवे हे शेतकरी कुटुंबातले आहेत. अशा व्यक्तीने शेतकरी कुटुंबाविषयी बोलणं योग्य नाही. याचा मी निषेध करतो. दानवेंचे विधान अर्थहीन आहे. त्याला महत्त्व देण्याचं कारण नाही. शेतकरी लाखांचा पोशिंदा आहे. त्याला मदत झालीच पाहिजे. याबाबत केंद्राने हटवादी भूमिका घेणे योग्य नाही. एनडीए मधील घटक पक्ष केंद्र सरकार पासून बाजूला गेले. अनेक जण आपलं पुरस्कार परत करत आहेत. अशा अनेकांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे. शेतकरी कामाचं मोल मागतात त्यात काही चूक नाही,''

अजित पवार पुढे म्हणाले, "काल पवार साहेब सरकारला भेटले. केंद्रातले वरिष्ठ मंत्री शेतकर्‍यांशी बोलत आहेत. पण तोडगा निघत नाहीये.  हे कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.  विरोधी पक्षाला यात राजकारण करायचं नाही. 
यात सत्ताधारी पक्षाचे नेते सांगतात की हे कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. पण शेतकऱ्यांना ते मान्य नाही. शेतकरी अनेक दिवसापासून थंडीत तिकडे आंदोलन करत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे मागणी येते तेव्हा सरकारने हटवादी भूमिका न घेता सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे,"

पुण्यात कोथरुडमध्ये काल आलेल्या गव्याचा त्याला पकडण्याच्या प्रयत्नात मृत्यू झाला. त्याबाबत अजित पवार म्हणाले, "प्राण्यांच्या भागात आपलं अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वन्यप्राणी बाहेर येतात. जंगल तोड मोठ्या प्रमाणात झाली आहे. विकासाच्या नावाखाली जंगलतोड झाली त्याचा फटका या प्राण्यांना बसला आहे.  काल या रान गव्यालाउचकवण्याचा करण्याचा प्रयत्न झाला. तो स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता. पण दुर्दैवाने आमचा वनविभाग त्यात अपयशी ठरला,"

कोरोना लशीबाबत बोलताना पवार म्हणाले, "राज्य सरकारने कोरोना लशीकरणाची तयारी सुरु केली आहे. सैन्यदलांना प्रथम लस दिली जाणार आहे. केंद्र, राज्य व जिल्हास्तरावर समिती गठित करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारनेही आपली तयारी सुरू केली आहे.''
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख