देशातील आठ शहरांसाठी पुण्याहून असे आहे विमान भाडे 

दिल्लीसाठी 6 ते 8 हजार, कोचीनसाठी 8 ते 9 हजार रुपये, जयपूरसाठी 7 हजार, बंगळूरूसाठी 5 हजार रुपये... हे आहे सोमवारी सुरू झालेल्या विमान सेवेचे पुण्यापासूनचे प्रवासभाडे. प्रवाशांचा प्रतिसाद कमी-जास्त होत असल्यामुळे प्रवास भाड्याचे हेलकावे दिवसभर सुरू होते.
 Air fare from Pune to eight cities in the country
Air fare from Pune to eight cities in the country

पुणे ः दिल्लीसाठी 6 ते 8 हजार, कोचीनसाठी 8 ते 9 हजार रुपये, जयपूरसाठी 7 हजार, बंगळूरूसाठी 5 हजार रुपये... हे आहे सोमवारी सुरू झालेल्या विमान सेवेचे पुण्यापासूनचे प्रवासभाडे. प्रवाशांचा प्रतिसाद कमी-जास्त होत असल्यामुळे प्रवास भाड्याचे हेलकावे दिवसभर सुरू होते. 

कोरोनाच्या लॉकडाउनमुळे 25 मार्चपासून देशातील विमान वाहतूक बंद होती. मात्र, देशांतर्गत विमान वाहतूक सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने 22 मे रोजी घेतला. त्यानुसार विमान कंपन्यांनी 23 मे पासून बुकींग सुरू केले. पण महाराष्ट्र सरकारने सुरुवातीला देशांतर्गत विमान वाहतूक सुरू करण्यास 24 मे रोजी नकार दिला. त्यावर दिवसभर चर्चा होत राहिली आणि त्याच दिवशी रात्री राज्य सरकारने विमान वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली. 

या पार्श्वभूमीवर विमान वाहतूक सुरू होणार का, या बाबत अनिश्‍चितता होती. मात्र, काही विमान कंपन्यांनी खुले केलेले आरक्षण पुन्हा बंद केले होते. त्यामुळे प्रवास भाड्याबाबतही अनिश्‍चितता होती. 24 मे रोजी रात्री उशिरा अखेर विमान वाहतूक सुरू होणार असल्याचे लक्षात आल्यावर विमान कंपन्यांनी त्यांचे भाडे वाढवून निश्‍चित केले. दिल्लीसाठी आठ हजार रुपयांनी सुरुवात करण्यात आली. परंतु, ते दर 6 ते 8 हजार रुपयांपर्यंत मर्यादीत राहिले. विमान कंपन्यांचे दर मागणी-पुरवठा तत्त्वानुसार निश्‍चित होतात. परंतु, अनिश्‍चिततेमुळे दरांचेही हेलकावे कायम राहिल्याचे पहिल्या दिवसाच्या बुकींगवरून दिसून आले. 

पुण्यावरून दिल्लीसाठी 6 ते 8 हजार, बंगळूरुसाठी 3800 ते 5296, कोचीनसाठी 8 ते 9231, जयपूरसाठी 6953, अहमदाबादसाठी 4200, हैदराबादसाठी 5800 ते 8220, चेन्नईसाठी 4700 ते 7521, रुपये हा प्रवास भाड्याचा दर असल्याचे सोमवारी सकाळी दिसून आले. अर्थात विमान वाहतूक सुरू झाल्यावर मागणी वाढून दर पुन्हा कमी-जास्त होऊ शकतात, असे एका विमान वाहतूक कंपनीच्या प्रतिनिधीने "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

दरम्यान, गरज असेल तरच विमान प्रवास करावा, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात अडकलेले प्रवासीच प्रवास करतील, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पुण्यावरून दिल्ली, चेन्नई, कोचीन, हैदराबाद, कोलकत्ता, बंगळुरू, जयपूर, अहमदाबाद या शहरांसाठी विमान वाहतूक सुरू झाली आहे. 

प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची ः भन्साळी 

या बाबत ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ पुण्याचे (टॅप) संचालक नीलेश भन्साळी म्हणाले, देशांतर्गत विमान वाहतूक सुरू झाली, ही स्वागतार्ह बाब आहे. विमान कंपन्यांनी या बाबत तिकिटांचे बुकींग करणाऱ्या कंपन्यांना पूर्वकल्पना दिली असती, तर आणखी तयारी करता आली असती. त्यामुळे प्रवासी आणि विमान कंपन्या या दोन्ही घटकांचा फायदा झाला असता. येत्या दोन दिवसांत विमान वाहतूक सेवा पूर्ववत होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, त्यासाठी प्रवाशांची पुरेशी काळजी घेतली गेली पाहिजे. कारण आमचे नुकसान झालेले असले तरी, प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com