56,000 patients in the state became free from corona | Sarkarnama

राज्यात 56 हजार रुग्ण कोरोनामुक्त 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 16 जून 2020

राज्यात सोमवारी (ता. 15) सुमारे पाच हजार 71 रुग्णांना कोरोनातून बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. यात एकट्या मुंबईतील 4242 रुग्णांचा समावेश आहे. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी विक्रमी संख्येने कोरोना रुग्णांना बरे झाल्यामुळे दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

मुंबई : राज्यात सोमवारी (ता. 15) सुमारे पाच हजार 71 रुग्णांना कोरोनातून बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. यात एकट्या मुंबईतील 4242 रुग्णांचा समावेश आहे. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी विक्रमी संख्येने कोरोना रुग्णांना बरे झाल्यामुळे दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला होता. आता पुन्हा सोमवारी मोठ्या संख्येने बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. 

दरम्यान राज्यात आतापर्यंत 56 हजार 49 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. या पूर्वी 29 मे रोजी एकाच दिवशी 8 हजार 381 कोरोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर सातत्याने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत गेलेली आहे. कोरोनावर मात केलेल्या 5071 रुग्णांना सोमवारी घरी पाठवण्यात आले. त्यांच्यात मुंबई विभागातील 4242 (आतापर्यंत 39 हजार 976), पुणे विभागातील 568 (आतापर्यंत 8430), नाशिक विभागातील 100 (आतापर्यंत 2365), औरंगाबाद विभागातील 75 (आतापर्यंत 1945), कोल्हापूर विभागातील 24 (आतापर्यंत 1030), लातूर विभागातील 11 (आतापर्यंत 444), अकोला विभागातील 22 (आतापर्यंत 1048) आणि नागपूर विभागातील 29 (आतापर्यंत 811) व्यक्तींचा समावेश होता. 

राज्यात एक लाख 10 हजार रुग्ण 

दरम्यान, राज्यात सोमवारी कोरोनाचे 2786 नवीन रुग्ण आढळले असून बाधितांची एकूण संख्या 1 लाख 10 हजार 744 वर गेली आहे. एकट्या मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत सोमवारी 1066 नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 59,201 झाली. आणखी 178 रुग्ण दगावल्याने कोरोना मृत्यूचा आकडा 4 हजार 128 पर्यंत पोचला आहे. राज्यात 50 हजार 554 ऍक्‍टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

मुंबईत 68, वसई-विरारमध्ये 20, मिरा-भाईंदरमध्ये 13, नवी मुंबईत 12, ठाण्यात 12, पनवेलमध्ये सात, कल्याण-डोंबिवलीत नऊ, पालघरमध्ये एक, रायगडमध्ये एक, पुण्यात 14, सोलापूरमध्ये दोन, धुळ्यात 13, जळगावमध्ये तीन, रत्नागिरीत एक आणि जालन्यात दोन अशा 178 रुग्णांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. मृतांमध्ये 122 पुरुष आणि 56 महिलांचा समावेश आहे. त्यांच्यापैकी 91 रुग्ण 60 वर्षे किंवा त्यावरील, 74 रुग्ण 40 ते 59 वर्षे वयोगटातील, 13 रुग्ण 40 वर्षांखालील होते. एकूण 41 जणांच्या इतर आजारांबद्दल माहिती उपलब्ध नाही. उर्वरित 137 रुग्णांपैकी 95 जणांना (69.34 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे अतिजोखमीचे आजार होते. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत 4128 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याच्या तीन महिन्यांनंतर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 47.2 टक्के आहे. कोव्हिड उपचारांसाठी त्रिसूत्री कार्यक्रम आखण्यात आला असून, प्रत्येक रुग्णाची काळजी घेण्यात येत आहे. दीर्घकालीन आजारी व गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी खास पथके नेमण्यात आली आहेत. 
- राजेश टोपे, आरोग्यमंत्री 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख