मुंबई पालिकेच्या 25 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू - 25 employees of Mumbai Municipal Corporation die due to corona | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबई पालिकेच्या 25 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 28 मे 2020

मुंबई महापालिकेच्या किती कर्मचाऱ्यांना कोव्हिडची बाधा झाली. त्यातील किता जणांचा कोव्हिडमुळे मृत्यू झाला, याची माहिती जाहीर करण्याची मागणी महापालिकेची कर्मचारी संघटना करत होती. त्यानुसार कोव्हिडमुळे मुंबई महापालिकेच्या 25 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1500 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती पहिल्यांदाच महापालिकेने दिली. 

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या किती कर्मचाऱ्यांना कोव्हिड-19 विषाणूची बाधा झाली आहे. त्यातील किता जणांचा कोव्हिडमुळे मृत्यू झाला आहे, याची माहिती जाहीर करण्याची मागणी महापालिकेची कर्मचारी संघटना प्रशासनाकडे करत होती. त्यानुसार कोव्हिडमुळे मुंबई महापालिकेच्या 25 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1500 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती पहिल्यांदाच महापालिकेने दिली. 

महापालिकेच्या कर्मचारी संघटनेच्या मागणीनंतर गेल्या आठवड्यात सर्व विभागांतील प्रमुखांनी कोरोनाबाधितांची माहिती जाहीर करावी, असा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानंतर पहिल्यांदाच ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. 

मुंबई महापालिकेचे वैद्यकीय कर्मचारी कोरोनाविरोधी लढाईत अग्रभागी आहेत. निर्जंतुकीकरण, कॉंटॅक्‍ट ट्रेसिंग, झोपडपट्ट्यांतील रहिवाशांची चाचणी, गरजूंना अन्नपुरवठा या जबाबदाऱ्याही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर आहेत, परंतु मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होत असतानाही महापालिकेने माहिती दिली नव्हती.

आता नवनियुक्त आयुक्त इक्‍बालसिंग चहल यांनी ही माहिती जाहीर केली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत महापालिकेच्या 25 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. एकूण 1,529 कर्मचारी कोव्हिडबाधित असल्याचे सांगण्यात आले. 

कॅशलेसची अंमलबजावणी करा ः टोपे 

दरम्यान, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सर्व नागरिकांना कॅशलेस उपचार देणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य या देशातील महत्वाकांक्षी योजनेची जिल्ह्यांत काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे सांगितले. 

दरम्यान, सध्या 80 टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत. स्थलांतरित आणि लॉकडाऊन शिथिल केल्याने प्रवास करत असलेल्या नागरिकांमुळे ज्या जिल्ह्यांत रुग्ण नव्हते, तिथेही प्रादुर्भाव दिसू लागला आहे. एकीकडे राज्याचे अर्थचक्र सुरू करीत असलो तरी त्यामुळे आपल्यावरील जबाबदारी अधिक वाढते, हे लक्षात घेऊन विषाणूचा पाठलाग जास्त गांभीर्याने करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिले. 

राज्यातील रुग्णसंख्या मोठी असली तरी रुग्ण झपाट्याने बरेही होत आहेत. फिल्ड हॉस्पिटल, पल्स ऑक्‍सीमीटरचा वापर, प्लाझ्मा थेरपी, 80 टक्के बेड्‌स राखीव ठेवणे, शंभर टक्के कॅशलेस उपचार, व इतर काही गोष्टी प्रभावी ठरताहेत. महाराष्ट्र यात देशात उदाहरण निर्माण करेल, असा विश्वासही या वेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 

संस्थात्मक विलगीकरणात ठेवलेल्या रुग्णांची नियमित तपासणी करणे खूप महत्वाचे आहे. त्याच्या शरीरातील ऑक्‍सिजन पातळी पल्स ऑक्‍सिमीटरद्वारे तपासावी, रक्तदाबाकडे लक्ष ठेवावे. चाचणी ही लक्ष्य केंद्रित असावी. जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर घराघरांत सर्वेक्षण करून रुग्ण शोधणे खूप महत्वाचे आहे. रुग्णाला रुग्णालयातून सोडण्याबाबत कार्यपद्धती ठरविण्यात आली आहे त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी. असेही ते म्हणाले. 

दर फलक बंधनकारक

 राज्यात 104 हेल्पलाईन क्रमांक सुरु करीत असून, रुग्णालये जास्त दर आकारत असतील तर नागरिकांना इथे तक्रार करता येईल, असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी देखील त्यांच्या स्तरावरून अशा तक्रारींची दखल घ्यावी, त्यासाठी नोडल अधिकारी नेमावा. प्रत्येक रुग्णालयाने उपचारांच्या दरांचे फलक रुग्णालयाबाहेर लावणे गरजेचे आहे. ते त्यांनी केले आहे का? हे तपासणे गरजेचे आहे. रुग्णालयांतील 80 टक्के बेड्‌स देखील आपण ताब्यात घेतले आहेत, पण त्याप्रमाणे तिथे अंमलबजावणी होते का ते प्रत्यक्ष पहावे, असेही त्यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख