This year, Ganeshotsav Mandals will have to strictly follow the rules! | Sarkarnama

यंदा गणेशोत्सव मंडळांना नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार ! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 11 जुलै 2020

गणपतीची आरती, आगमन, विसर्जन कार्यक्रमांना केवळ दहा कार्यकर्त्यांनाच उपस्थित राहावे लागणार आहे.

मुंबई : यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवावर करोनाचेच सावट आहे. मूर्तीची उंची कमी होणार आहेच, पण त्याचबरोबर मंडळांना अनेक नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.भक्तांना यंदा मंडपात जाऊन गणेशमूर्तीचे दर्शन घेता येणार नाहीच, पण हार, फुलेही अर्पण करता येणार नाहीत. 

गणपतीची आरती, आगमन, विसर्जन कार्यक्रमांना केवळ दहा कार्यकर्त्यांनाच उपस्थित राहावे लागणार आहे. मुंबईत साधारणत: साडेबारा हजार गणेशोत्सव मंडळे असून त्यांच्यासाठी यंदाचा गणेशोत्सव तडीस नेणे ही तारेवरची कसरत ठरणार आहे. 

या नियमांविषयी बोलताना बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर म्हणाले, की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला आम्ही सर्व मंडळाने प्रतिसाद दिला आहे. मंडप उभारताना महापालिकेने ज्या अटी घातल्या आहेत त्याचे तंतोतंत पालन करावे असे मी आवाहन करतो.

समन्वय समिती सर्व मंडळांबरोबर आहे. मुर्तींच्या उंचीबाबत जो निर्णय घेतला आहे त्यालाही सर्वच मंडळाने सहकार्य केले आहे. सार्वजनिक गणेशोत्व मंडळाने सरकारला आणि महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल दहिबाकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

गणेशोत्सव मंडळांसाठी नियम 
- मंडपात एका वेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्ते राहू नयेत. मंडपात वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क लावणे बंधनकारक. 
- मंडपाच्या मुख्य भागाचे दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण करावे, कार्यकर्त्यांना सॅनिटायझर उपलब्ध करून देणे. 
- मंडपाच्या लगत फुले, हार, प्रसाद यांच्या विक्रीचे स्टॉल लावता येणार नाहीत. 
-आरतीला मंडपात जास्तीत जास्त दहा कार्यकर्त्यांना प्रवेश. आगमन, विसर्जन याप्रसंगी मिरवणूक काढता येणार नाही. केवळ दहा कार्यकर्त्यांची उपस्थिती बंधनकारक. 
- मंडप सजावट, देखावे, रोषणाई यांना मुरड घालून मंडळातर्फे जनजागरण, रक्तदान, आरोग्य तपासणी असे कार्यक्रम आयोजित केले जावे. व्यावसायिक जाहिरातींनाही प्रतिबंध. 
- भक्तीपर किंवा अन्य कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही. 
- कमीत कमी निर्माल्य तयार होईल याची काळजी घेणे. 
- ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळून करोना रुग्ण, अन्य रुग्णांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख