MPSC च्या रिक्त जागा भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार : अमित ठाकरे - We Will meet Chief Minister to fill MPSC vacancies : Amit Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

MPSC च्या रिक्त जागा भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार : अमित ठाकरे

  रमेश वत्रे
मंगळवार, 6 जुलै 2021

कोणतीही मदत लागली तर थेट फोन करा.

केडगाव (जि. पुणे) : सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे, त्यामुळे राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचे भविष्य अंधारात आहे. हा विषय आम्ही लावून धरणार असून या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित राज ठाकरे यांनी सांगितले. (We Will meet Chief Minister to fill MPSC vacancies : Amit Thackeray)

एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न लागल्यामुळे आत्महत्या केलेल्या स्वप्नील सुनील लोणकर याच्या कुटुंबीयांची अमित ठाकरे यांनी दौंड तालुक्यातील केडगाव येथे भेट घेऊन सांत्वन केले. या वेळी मनसेच्या वतीने दोन लाख रूपयांचा धनादेश ठाकरे यांच्या हस्ते लोणकर कुटुंबीयांना देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अमित ठाकरे म्हणाले, घडलेली घटना ही दुर्देवी आहे. लोणकर कुटुंबीयांच्यामागे संपूर्ण मनसे पक्ष उभा आहे. कोणतीही मदत लागली तर थेट फोन करा. या संदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली जाईल.

हेही वाचा : मोठे फेरबदल : केंद्रीय मंत्र्याकडे कर्नाटकचे राज्यपालपद; चार नवीन राज्यपालांची नियुक्ती अन् तिघांची बदली

स्वप्नील लोणकर हा एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला होता. कोरोनामुळे त्याची मुलाखत न झाल्याने नियुक्ती होत नव्हती. वय वाढत असल्याने नैराश्यामधून त्याने ३० जून रोजी फुरसुंगी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. लोणकर कुटुंबीय हे मूळचे केडगावचे. स्वप्नीलच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्वप्नील हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूचे विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही पडसाद उमटले. 

या वेळी मनसेचे नेते राजेंद्र वागस्कर, मनसेचे उपाध्यक्ष सुधीर पाटसकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सागर पाटसकर, गजानन काळे, सचिन कुलथे, राजू चातू, प्रजोत वाघमोडे, प्रीतम वलेचा, सुनील नवले, नीलेश वाबळे, पोपट सूर्यवंशी, संतोष भिसे, मंगेश साठे, अविनाश गुढाटे, राष्ट्रवादीचे तुषार थोरात, दिलीप हंडाळ आदी उपस्थित होते.  

‘‘कोरोनाच्या काळात निवडणुका होऊ शकतात. मग, एमपीएससीच्या मुलाखती का होऊ शकत नाहीत. सरकार कारणे देत असल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे’’, अशी खंत स्वप्नील लोणकरचे वडील सुनील व आई छाया यांनी व्यक्त केले.  

ते म्हणाले की, स्वप्नीलला लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड होती. सनदी अधिकारी तुकाराम मुंडे व पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा त्याच्यावर प्रभाव होता. लहानपणी वाढदिवसाला मिळालेल्या पैशातून तो गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देत असत. माझ्या मुलाच्या मृत्यूनंतर सरकारला जाग आली आहे. हे दुर्देव आहे.

सरकारने घेतलेले निर्णय आठ दिवसांपूर्वी घेतले असते, तर स्वप्नीलचा जीव नक्की वाचला असता. एमपीएससीच्या मुलाखती घेऊन जागा भरणे, हीच स्वप्नीलला श्रद्धांजली ठरेल. आमचा म्हातारपणाचा आधार गेला आहे. कोणत्याही विद्यार्थ्याने तणावात न राहता टोकाचा निर्णय घेऊ नये. नोकरी नाही मिळाली तरी चालेल काहीही व्यवसाय करून चटणी भाकरी खाऊ, पण असा निर्णय कोणी घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख