कोरेगाव भीमा प्रकरण : वरवरा राव यांची जामीनावर सुटका... - Varvara Rao gets interim bail in koregaon bhima case | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूजा चव्हाण मृत्यप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

कोरेगाव भीमा प्रकरण : वरवरा राव यांची जामीनावर सुटका...

वृत्तसंस्था
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून वरवरा राव यांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणात आरोपी असलेले तेलुगू कवी वरवरा राव यांची मुंबई उच्च न्यायालयाने जामीनावर सुटका केली आहे. वैद्यकीय कारणास्तव आज त्यांचा सहा महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला. तसेच त्यांना मुंबईतच राहण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. 

भीमा कोरेगाव प्रकरणाचा 'एनआयए'कडून तपास सुरू आहे. त्यामध्ये माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून वरवरा राव यांनाही अटक करण्यात आली आहे. न्यायालयामध्ये मागील सुनावणीवेळी वरवरा राव यांच्या वकील इंदिरा जयसिंह यांनी प्रकृतीचे कारण देत अंतरिम जामीनाची मागणी केली होती. वरवरा राव हे फेब्रुवारी २०२० पासून १४९ दिवस रुग्णालयात असल्याचे त्यांनी सांगितले होते. ते ८२ वर्षांचे आहेत. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. 

ही मागणी न्यायालयाने मान्य करत वरवरा राव यांना सहा महिन्यांसाठी जामीन मंजुर केला. जामीन देताना न्यायालयाने राव यांना मुंबईतच राहण्याचे तसेच तपासाला सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.वरवरा राव यांना जामीन देताना उच्च न्यायालयाने महत्वाचे निरीक्षणही नोंदविले. तळोजा तुरूंग रुग्णालयातील परिस्थिती आणि त्यांची प्रकृती पाहता जामीन न दिल्यास त्यांच्या मलूभूत हक्कांचे रक्षण करण्याच्या आमच्या कर्तव्यात कसूर केल्यासारखे होईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

सहा महिन्यानंतर त्यांच्या प्रकृतीत झालेली सुधारणा पाहून पुन्हा कारागृहात परतण्याचा किंवा जामीनाची मुदत वाढविण्याचा पर्यायही न्यायालयाने दिला आहे. एनआयएतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी राव यांना जामीन न देण्याची विनंती न्यायालयाला केली होती. पण न्यायालयानेही ही विनंती फेटाळून लावत वरवरा राव यांना दिलासा दिला.

 पुण्यात एल्गार परिषदेनंतर कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसा झाली होती. त्यामध्ये एकाचा मृत्यूही झाला तर अनेकजण जखमी झाले. दरम्यान, या प्रकरणातील एकुण १६ आरोपांपैकी जामीन मिळालेले वरवरा राव हे पहिलेच आरोपी आहेत. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख