अजित पवारांच्या नावाने मुंबईतील बिल्डरला तोतयाकडून धमकी  - Threatened builder in Mumbai using Ajit Pawar's name | Politics Marathi News - Sarkarnama

अजित पवारांच्या नावाने मुंबईतील बिल्डरला तोतयाकडून धमकी 

मिलिंद संगई 
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

उपमुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असून अजितदादा पवार यांच्याकडे आपल्याविरुद्ध तक्रार आली आहे.

बारामती : मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव वापरून धमकी देणाऱ्यास बारामती शहर पोलिसांनी आज (ता. 17 ऑक्‍टोबर) अटक केली. 

या संदर्भात मुंबई येथील बांधकाम व्यावसायिक अजय कामदार यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार बारामती शहर पोलिसांनी तुषार तावरे (रा. तारांगण सोसायटी, बारामती) यास अटक केली आहे. 

बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी या संदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अजय कामदार यांना तुषार तावरे याने फोन करून मी उपमुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असून अजितदादा पवार यांच्याकडे आपल्याविरुद्ध तक्रार आली आहे. ती तुम्हाला व्हॉटस ऍपवर पाठवली आहे, ती बघा, असे सांगितले. या तक्रारीवर तत्काळ कारवाई करावी, असा शेरा मारून पोलिस उपआयुक्त झोन-9 तसेच सहायक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना रिमार्क मारून त्या खाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सही असल्याचे कामदार यांना दिसले. 

बिल्डर कामदार यांनी घाबरून तुषार तावरे याच्याशी संपर्क साधला असता तुमच्याविरुध्द दिलेला अर्ज मी कमिशनर यांच्याकडे पाठविलेला नाही. तो माझ्याकडेच ठेवला आहे. तुमचे व अर्जदार यांचे जे वाद आहेत, ते तीन दिवसांत मिटवून घ्या, नाहीतर तुमच्या विरुध्द कारवाई होईल, असे तावरे याने धमकावले. 

बांधकाम व्यावसायिक कामदार यांनी थेट उपमुख्यमंत्री कार्यालयात फोन लावून याबाबतची चौकशी केली. त्या वेळी तुषार तावरे नावाचा कोणीही कर्मचारी कार्यालयात नसल्याचे सांगितले. अजित पवार हे आज बारामतीत असून त्यांनाच हा प्रकार सांगावा, असे सांगितले गेले. 

कामदार यांनी बारामती गाठत पवार यांचे स्वीय सहायक सुनील मुसळे यांची भेट घेतली. मुसळे यांनी कामदार यांना तातडीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यास सांगितले. त्या नंतर कामदार यांनी शहर पोलिसांत तुषार तावरे याच्या विरोधात फिर्याद दिली. 

दरम्यान, तुषार तावरे याने अन्य कोणाची उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या नावाने फसवणूक केली असल्यास बारामती शहर पोलिसांत फिर्याद दाखल करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी केले आहे. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख