मुख्यमंत्र्यांचा वेळ तुम्हाला, मला मिळाला नसला तरी ते पवारसाहेबांना नक्की वेळ देतील : राज ठाकरे 

कारण, सरकार त्यांच्यावर अवलंबून आहे.
Supporters of Nanar project met Raj Thackeray in Mumbai
Supporters of Nanar project met Raj Thackeray in Mumbai

मुंबई : "नाणार प्रकल्पासंदर्भात मी फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहिले नाही, तर ते ज्येष्ठ नेते शरद पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवले आहे. पत्र मिळाल्यानंतर मला शरद पवार यांचा फोन आला होता. "तुम्ही घेतलेली भूमिका ही अत्यंत योग्य भूमिका आहे. अशा प्रकारचे प्रकल्प आतातरी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ नयेत,' असे तेही म्हणाले. ते स्वतः मुख्यमंत्री ठाकरे यांना नाणार प्रकल्पाबाबत बोलणार आहेत. तुम्हाला आणि मला जरी मुख्यमंत्र्यांचा वेळ मिळाला नाही, तरी ते पवारसाहेबांना वेळ देतील. कारण, सरकार त्यांच्यावर अवलंबून आहे,'' अशा शब्दांत मंत्रालयात न झालेल्या भेटीबाबत राज यांनी मुख्यमंत्र्यांना कोपरखळी मारली. 

नाणार येथील रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नये, अशी भूमिका घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. कोकणातील नाणार समर्थकांनी सोमवारी (ता. 8 मार्च) राज यांची भेट घेत हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत राहावे, असे विनंती केली. त्या वेळी राज ठाकरे बोलत होते. 

राज म्हणाले, "आपल्याकडे लोक यायला तयार आहेत. पण, आपण त्यांना काही गोष्टी पुरवायला तयार नाही आहोत. माझ्या पत्राचा शेवटही असाच आहे की पर्यावरणावर सरकारने लक्ष द्यावे. आताच्या परिस्थितीत नाणार रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ नये, हे सरकारने पाहणे अत्यंत आवश्‍यक आणि गरजेचे आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यानंतर आताही कोरोनाच्या काळात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोनाच्या काळात अनेक लोक हात झटकून मोकळे झाले. ज्यावेळी अनेकांना कामावर काढून टाकलं, त्यावेळी कोरोनाच्या लॉकडाउनचं कारण त्यांच्याकडे होते. ज्यांना कामावरून काढून टाकलं त्यातील अनेकांना ते पटलंसुद्धा. लॉकडाउनमुळे मालकही काही करू शकणार नाही, हे ओळखून कामगारांनीही गोंधळ केला नाही.'' 

सध्याच्या परिस्थितीत नाणारसारखा प्रकल्प नोकऱ्या देऊ शकत असेल तर असा प्रकल्प राज्याबाहेर घालवू नये, असे मी पत्रात नमूद केले आहे. नाणारच्या या प्रकल्पात आपल्या महाराष्ट्रातील मुला-मुलींना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळायला हवं, नाहीतर आम्ही आहोतच, असा इशाराही राज ठाकरे यांनी या वेळी दिला. 

"कोकणात आपल्याला पर्यटनावरच आधारित रोजगारनिर्मिती करायला हवी आणि भविष्यात त्यावरच लक्ष केंद्रित करू. पण, सध्याच्या विदारक परिस्थितीत ग्रीन रिफायनरीसारखे प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नयेत, अशी माझी भूमिका आहे, असे राज यांनी या वेळी नमूद केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com