महाविकास आघाडी सरकार बदलणारा अजून जन्माला यायचा आहे  ः अजित पवारांचा फडणवीसांवर पलटवार

आणखी त्यांना 30 आमदार कमी पडत असताना ते सरकार बदलायची भाषा बोलतात.
Mahavikas Aghadi government changer is yet to be born : Ajit Pawar :
Mahavikas Aghadi government changer is yet to be born : Ajit Pawar :

पंढरपूर : महाराष्ट्रातील जनतेच्या विश्वासावर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी एकत्रित येऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार बनवलं आहे. असं हे भरभक्कम संख्याबळ असलेलं सरकार बदलणारा अजून जन्माला यायचा आहे, असा पलटवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथील जाहीर सभेत बोलताना केला. 

दोन दिवसांपूर्वा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत बोलताना तुम्ही भाजपचा एक उमेदवार निवडून द्या, मी सरकार बदलवून दाखवतो, असा सूचक इशारा महाविकास आघाडीला दिला होता. त्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. सरकार बदलायला हा काय पोरखेळ वाटला का, असा टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना लगावला.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. या वेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, भगिरथ भालके, कल्याण काळे, दिलीप धोत्रे, संभाजी शिंदे, आमदार संजय शिंदे, उमेश पाटील, किरण घाडगे, संदिप माडवे, विजयसिंह देशमुख, सुधीर भोसले आदी उपस्थित होते.

हा काय पोरखेळ वाटला का?

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची विचारधारा वेगवेगळी असली, तरी सर्वसामान्य लोकांचा विकास व्हावा, यासाठी हे सरकार स्थापन झालं आहे. महाविकास आघाडीला 170 आमदारांचा पाठिंबा आहे. तर विरोधकांकडे जेमतेम 115 आमदार आहेत. आणखी त्यांना 30 आमदार कमी पडत असताना ते सरकार बदलायची भाषा बोलतात. त्यांना हा काय पोरखेळ वाटला का. केवळ निवडणुकीत गाजर दाखवण्याचं त्याचं  काम सुरु आहे. सरकार बदलणारा अजून जन्माला यायचा आहे, असे म्हणत विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.

भाजपने पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय केला

मागील पाच वर्षांत भाजप-शिवसेनेच्या काळात पश्चिम महाराष्ट्रावर मोठा अन्याय झाला. या भागातील अनेक योजनांना जाणूनबुजून निधी दिला नाही. मंगळवेढा तालुक्यातील उपसा सिंचना योजनेला देखील निधी दिली नाही. आता पुन्हा आमचं सरकार आलं तर आम्ही निधी देऊ असं सांगत आहेत. मग, मागील पाच वर्षांत तुमचा कोणी हात धरला होता का, असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला.

फडणवीस पाच वर्षे विरोधी पक्षनेते राहतील का?

विरोधी पक्षाकडून अजूनही राजकारण केलं जात आहे. मागील पाच वर्षात त्यांनी पक्षात येणाऱ्या लोकांचीच कामं केली.  भाजपत कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत येऊ लागले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकेल. पण, देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षे तरी विरोधी पक्षनेतेपदी राहतील की नाही, याविषयी आता शंका निर्माण झाल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. 

या वेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे, संदीप मांडवे आदींची भाषणे झाली. सभेला मोठी गर्दी झाली होती.


फडणवीसांमुळेच घड्याळाला मत द्या सांगण्याची संधी मिळाली

गेली 36 वर्षे  महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपचं लव्ह मॅरेज होतं. त्यानंतर आता आमच्यात अंतर पडले आहे. त्यामुळे 36 वर्षानंतर राष्ट्रवादीच्या घड्याळ्याला मत द्या म्हणून सांगतोय. ही संधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळाल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस हे मागील दीड वर्षापासून सत्तेची स्वप्न बघतायत असं म्हणत त्यांनी भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. भाषणा दरम्यान त्यांनी केलेल्या शेरोशायीरीला उपस्थितांनी  शिट्टया आणि टाळ्या वाजवून दाद दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com