मुंबईहून आलेल्या कुटुंबामुळे जुन्नर तालुका कोरोनाबाधित 

मुंबईहून आलेल्या कुटुंबामुळे जुन्नर तालुका कोरोनाग्रस्त झाला असून एकूण सहा रुग्ण बाधित असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. यात धोलवड येथील तीन, सावरगावचे दोन व मांजरवाडी येथील एक रुग्ण अशा एकूण सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
Junnar taluka corona affected due to family come from Mumbai
Junnar taluka corona affected due to family come from Mumbai

जुन्नर : मुंबईहून आलेल्या कुटुंबामुळे जुन्नर तालुका कोरोनाग्रस्त झाला असून एकूण सहा रुग्ण बाधित असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. यात धोलवड येथील तीन, सावरगावचे दोन व मांजरवाडी येथील एक रुग्ण अशा एकूण सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

वाढत्या कोरोनाच्या भीतीने मुंबईहून गावाकडे येणाऱ्यांची संख्या दररोज वाढत आहे. सोमवारअखेर (ता. 25) तालुक्‍यात 13 हजार 681 जणांना होम क्वारंटाइन, तर 792 जणांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

लेण्याद्री येथील कोविड केंद्रात रुग्णाच्या घशातील द्रावाचे नमुने घेण्यास सुरवात करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत 18 जणांचे नमुने घेऊन तपासनीस पाठविण्यात आले. त्यापैकी एकाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

धोलवड, सावरगाव व मांजरवाडी येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने या गावांच्या सीमा बंद करण्यात आल्या असून येथे प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. या रुग्णांच्या संपर्कात कोण कोण आले, याचा शोध घेण्यात येत असून त्यांची कोरोना तपासणी करून घेण्यात येणार असल्याचे निवासी नायब तहसीलदार सचिन मुंढे यांनी सांगितले. 
 

जुन्नर शहराला दिलासा 

मुंबईहून जुन्नर शहरात आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले. यामुळे गेली सात दिवस चिंतेत पडलेले नागरिक व प्रशासनाने सोमवारी नि:श्‍वास सोडला आहे. 

मुंबईहून शहरात आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोना तपासणीसाठी पुण्याला पाठविले होते. त्यापैकी तिघांचे अहवाल 21 मे रोजी निगेटिव्ह आले होते. त्यानंतर उरलेल्या दोघांचे अहवालही निगेटिव्ह आले असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर व आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत खत्री यांनी दिली. 

मुंबईहून जुन्नरला 14 मे रोजी पाच जणांचे कुटुंब राहण्यासाठी आले. त्यांना "होम क्वारंटाइन' करण्यात आले होते. त्याच्या घरातील एक मुंबईला कोरोनाबाधित आढळून आल्याने येथील पाचही जणांना तीन रुग्णवाहिकेतून 19 मे रोजी तपासणीसाठी पुण्यात नेण्यात आले होते. यामुळे गावातील नागरिक चिंतेत पडले होते. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने नागरिकांची चिंता दूर झाली आहे. त्या सर्वांना संस्था क्वारंटाइन करण्यात आले आहे. 
 

खेडचेही मुंबई कनेक्‍शन 

कडूस ः ताप, खोकला, सर्दीसह मुंबईहून कडूस आणि कडूसहून पुन्हा मुंबईला गेलेल्या व्यक्तीसह वडगाव नजीक खेड येथे मुंबईहून आलेल्या एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन्ही व्यक्तींमुळे खेड तालुक्‍याचे मुंबईशी कोरोना कनेक्‍शन जोडले आहे. यामुळे तालुक्‍यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोनने वाढली आहे. 

राक्षेवाडी येथील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दहा दिवसांपासून खेड तालुक्‍यातील कोरोना रुग्णांची संख्या स्थिर होती. परंतु सोमवारी (ता.25) त्यात आणखी दोनची वाढ झाली. मुंबईहून आलेले दोघे कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.

ताप, खोकला, सर्दी असताना आठवड्यापूर्वी मुंबईहून कडूस आणि दोन दिवसानंतर पुन्हा कडूसहून मुंबईला गेलेल्या व्यक्तीने मुंबईतील एका खासगी दवाखान्यात स्वतःची तपासणी करून घेतली. त्यात त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी बळीराम गाढवे व पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे यांनी दिली. 

दोन दिवस संपर्कात येऊनही त्याच्या आजार व तपासणीकडे चांडोली ग्रामीण रुग्णालयाने गांभीर्याने पाहिले नाही. सरकारी यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे त्या व्यक्तीला पुन्हा मुंबईला जावे लागल्याने अख्ख्या कडूस गावचे आरोग्य धोक्‍यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दुसरा रुग्ण वडगाव पाटोळे गावात सापडला आहे. ही व्यक्ती दोन दिवसांपूर्वी कुटुंबासह मुंबईहून गावी आली होती. मुंबईहून आलेल्या नागरिकांनी नियम पाळण्याचे आवाहन सभापती राक्षे यांनी केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com