सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग हा घातपात?  - The fire at the Serum Institute is an accident? | Politics Marathi News - Sarkarnama

सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग हा घातपात? 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 21 जानेवारी 2021

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीला आज दुपारी भीषण आग लागली. जवळपास दोन तासांपासून ही आग धुमसत होती. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीला आज दुपारी भीषण आग लागली. जवळपास दोन तासांपासून ही आग धुमसत होती. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, कोरोना लस सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. या आगीबाबत भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनी शंका व्यक्त केली आहे. हा घातपाताचा प्रकार तर नाही ना असा प्रश्न मुक्ता टिळक यांनी उपस्थित केला. मुक्ता टिळक यांच्या शंकेनंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही हीच शंका व्यक्त केली आहे. 

इमारतीत कोरोनावरील कोव्हिशिल्ड लसीचं काम चालत नव्हतं. कोरोनावरील कोव्हिशिल्ड लस बनवण्याचं काम दुसऱ्या इमारतीत सुरु आहे. 

प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली होती. यादरम्यानच त्यांना सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीबाबत माहिती मिळाली. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली हे मलाही व्हॉट्सअॅप मेसेज आणि सोशल मीडियावरुन समजलं. पण ही आग लागली आहे. की, लावलेली आहे याची चौकशी झाली पाहिजे. 

मुक्ता टिळक काय म्हणाल्या?

दीडच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळतेय. कोव्हिड लसीच्या इमारतीला आग लागलेली नाही. त्यामुळे लस सुरक्षित आहे. हा घातपाताचा प्रकार वाटतोय, प्रथमदर्शनी असं वाटतंय. कारण ज्याठिकाणी आग लागलीय, त्या परिसरात कोरोना लस बनवण्याचं काम सुरु आहे. हा घातपाताचा प्रकार वाटतोय ही माझी शंका आहे” असे भाजप आमदार मुक्ता टिळक म्हणाल्या. 

सिरम इन्स्टिट्यूटमधील आगीत पाच जणांचा मृत्यू

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट इमारतीला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. वेल्डिंगचे काम सुरू असताना उडालेल्या ठिणग्यांमुळे ही आग लागल्याचेही टोपे यांनी सांगितले. सहा मजली असलेल्या या इमारतीत मोठे स्वरूप धारण केले. चार लोक अडकल्याची माहिती मिळाली होती. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे पंधरा बंब गेले होते. आग विझल्यानंतर सहाव्या मजल्यावर पाच जणांचे मृतदेह आढळले. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही या माहितीला दुजोरा दिला. मृत झालेले हे बांधकाम मजूर असण्याची शक्यता मोहोळ यांनी व्यक्त केली. 

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. मांजरी येथील कंपनीच्या इमारतीला बीसीजी लस ज्या ठिकाणी तयार केली जाते त्या ठिकाणी ही आग लागली होती. कोविशिल्ड लसीचं उत्पादन केलं जात आहे, तो भाग सुरक्षित आहे. आग लागल्यानंतर सर्वजण सुरक्षित असल्याचे सांगितले जात होते. जिवितहानी न झाल्याबद्दल सिरमचे व्यवस्थापकीय संचालक आदर पूनावाला यांनी समाधान व्यक्त केले होते. पण प्रत्यक्षात पाच जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख